खासगी बसेसच्या तुलनेने एसटी बसेसचे अपघात अत्यल्प

८० किमी वेगाला एसटीचा स्पीड लॉक; परिवहन विभागाच्या सूचनेनुसार महामंडळाची खबरदारी
खासगी बसेसच्या तुलनेने एसटी बसेसचे अपघात अत्यल्प

एसटी पुन्हा नव्या नियोजनानुसार प्रवासी वाहतूक करत आहे. जुन्या बसेसची मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली देखभाल-दुरुस्ती यामुळे प्रवासी एसटीकडे वळाले आहेत. अशातच भविष्यात होणारे एसटी अपघात रोखण्यासाठी बसेसच्या वेगावर मर्यादा आणण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार ताशी ८० किमी एवढी वेगमर्यादा म्हणजेच स्पीड लॉक महामंडळाकडून बसवण्यात आले आहेत. त्यामुळे यापेक्षा अधिक वेगाने एसटी बसेस धावू शकत नाहीत. दरम्यान, कोरोनानंतर रस्ते अपघात पाहता कोणताही अपघात न होता सुरक्षित एसटी प्रवास सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इतर वाहनांच्या तुलनेने एसटी अपघाताचे प्रमाण केवळ ०.६ एवढे असल्याचे सांगण्यात येत आहे.

तब्ब्ल ३ वर्षे विविध कारणांमुळे एसटी कर्मचारी आणि महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संपामुळे अनेक कर्मचाऱ्यांना ५ महिने पगारापासून वंचित राहावे लागले. तर राज्यभरात एसटी वाहतूक ठप्प झाल्याने महामंडळाचा महसूल देखील पूर्णपणे बंद झाला. २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार २२ मार्चपासून सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली. त्यानंतर म्हणजेच तब्ब्ल ५ महिन्यांनंतर एसटी रस्त्यावर धावू लागली. सुरुवातीला खासगी वाहतुकीचा लळा लागलेल्या प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. मात्र सद्यस्थितीत एसटी बसची वाढीव संख्या, वाढीव फेऱ्या आणि सुरक्षित प्रवास यामुळे पुन्हा सर्वसामान्य प्रवासी एसटीकडे वळला आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विविध नियोजन करण्यात आले आहे. तर एखादा अपघात घडल्यानंतर तातडीने महामंडळाकडून ३ लाखापर्यंत मदत दिली जात असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

रस्ते अपघात हे खाजगी वाहनामुळे जास्त प्रमाणात होतात. त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूकीचे अपघातांचे प्रमाण अत्यल्प आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ज्या खाजगी वाहनांचा अपघात चालकाच्या चुकीने होईल त्याचे लायसन्स रद्द करण्यात आले पाहिजे.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in