मुंबई / नागपूर
उपराजधानीतील ऑडी `हिट अँड रन`चा `पिण्या`वरून सुरू झालेला वाद आता `खाण्या`वर येऊन ठेपला आहे. चारचाकी व दुचाकीला धडक देणाऱ्या ऑडीचा मालक संकेत बावनकुळे याने मद्यपानाबरोबरच गायीचे मांस खाल्याचा दावा करण्यात आल्याने राजकारणाला आता धार्मिक रंगही दिला जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या मालकीच्या ऑडी कारने बेदरकारपणे भर चौकात काही चारचाकी व दुचाकीला धडक देण्याची नागपूरातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर सत्ताधारी महायुती तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांमध्ये वादाचा धुरळा उडू लागला आहे. यावरून एकमेकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत.
संकेत याच्या आलिशान गाडीने अनेक वाहनांना धडक दिल्याच्या प्रकारानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आणि राजकीय नेत्याच्या मुलाला वाचविण्यासाठी वाहनचालक हावरे याचा बळी दिल्याचा आरोप केला.
बीफ कटलेट सर्व्ह न केल्याचा हॉटेलमालकाचा दावा
ग्राहकाला वेटरने बीफ कटलेट दिले नसल्याचा दावा लाहोरी या हॉटेलचा मालक समीर शर्मा याने केला आहे. ग्राहक (संकेत बावनकुळे) हे त्यांच्या दोन ते तीन मित्रांसह हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी मद्यपान केले. मात्र कोणताही मांसाहारी पदार्थ त्यांनी मागितला नाही, असा दावा शर्मा यांनी केला. हे ग्राहक १५ ते २० मिनिटे आपल्या हॉटेलमध्ये थांबले, असेही शर्मा म्हणाले. बीफ देऊ केल्याच्या आरोपाबाबत शर्मा यांनी, याबाबत आपण आरोपकर्त्यांवर १,००१ कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा ठोकण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचेही सांगितले.
अंधारेंचा पोलिस अधिकाऱ्यावर प्रश्नांचा भडीमार
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूरच्या पोलिस ठाण्यात धडक देत तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. कारमध्ये तीन जण असताना नेमकी एकाचीच वैद्यकीय तपासणी का केली? दोघांविरुद्ध कारवाई केली तर तिसरा (संकेत बावनकुळे) प्रवासी कुठे गेला? अपघातानंतर कार पोलिस ठाण्यात आणण्याऐवजी गॅरेजमध्ये कशी नेली? अशा प्रश्नांची नेमकी उत्तरे देताना तपास अधिकारी भांबावल्याचा चित्रफित समाजमाध्यमावर फिरत होती.
संकेतने गोमांस सेवन केले नसल्याचा पोलिसांचा दावा
नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याने शहरातील एका बारमध्ये गोमांस सेवन केले नव्हते. मात्र संकेतने मद्यप्राशन केले होते आणि मटण आणि चिकनच्या पदार्थांचे सेवन केले होते, असे बुधवारी पोलिसांनी स्पष्ट केले.
संकेत याच्या आलिशान गाडीने नागपूरमध्ये अनेक गाड्यांना धडक दिल्यानंतर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी, संकेतने बारमध्ये गोमांस सेवन केल्याचा, आरोप केला होता. बारमध्ये संकेत अथवा त्याच्या मित्रांना गोमांस देण्यात आले नव्हते, आम्ही हॉटेलचे बिल तपासले असून त्यामध्ये गोमांस देण्यात आल्याचा उल्लेख नाही, असे परिमंडळ-२चे उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले.
धरमपेठ परिसरातील 'लाहोरी' या बारमध्ये संकेत आणि त्याच्या मित्रांनी मटन रोस्ट, मटण करी, चिकन टिक्का आणि मसाला शेंगदाणे आणि तळलेले काजू यांचे सेवन केले होते, त्यांनी १२ हजार रुपयांहून अधिक रकमेच्या मद्याच्या दोन बाटल्या मागविल्या होत्या, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.
वाहनाच्या गतीचा तपास आरटीओ करणार नाही?
या प्रकरणात नागपूर शहर आरटीओने संकेत बावनकुळे याच्या वाहनाची बुधवारी पुन्हा तपासणी केली. परंतु आरटीओ या वाहनाची गती तपासणार नसल्याची माहिती उघड झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आरटीओचे पथक बुधवारी पून्हा सीताबर्डी पोलीस ठाण्यात गेले. या पथकाने अपघातग्रस्त वाहनाचे सोमवारीही प्राथमिक निरीक्षण केले गेले होते. परंतु पथकाकडे वाहनाची चावी नसल्याने त्यांनी गाडीच्या आतील भागाची तपासणी केली नव्हती. वाहनाच्या कोणत्या भागाची मोडतोड झाली आहे, अपघाताला वाहनातील दोष कारणीभूत आहे का, या पद्धतीने तपास करण्याची सूचना पथकाला देण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आरटीओ पथकावर दबाव ?
आरटीओ पथकाकडून वाहनाची गती मात्र तपासली जाणार नाही. तर हे काम वाहतूक पोलिसांची समिती अथवा वाहन कंपनीमार्फत केले जाते, अशी सूत्रांची माहिती आहे. सलग दुसऱ्या दिवशी आरटीओने केलेल्या तपासणीत कारच्या समोरचा टायर कापलेला आढळून आला, गाडीचा बोनेटसह इतर भाग मोडलेला होता, अशी धक्कादायक माहिती पथकाच्या निदर्शनास आली. गाडीमधील एअर बॅग अपघातानंतर उघडल्या नसल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. आरटीओच्या अपघातानंतरच्या निरीक्षणात साधारणपणे गतीचेही निरीक्षण नोंदवले जाते. परंतु या प्रकरणात गतीवर मात्र लक्ष केंद्रित केले जात नसल्याने पून्हा आरटीओच्या पथकावरही दबाव आहे का, असा प्रश्न विरोधतांकडून उपस्थित केल्या जाण्याची शक्यता आहे.