शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आरोपी आपटे, पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी, शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना गुरुवारी दुपारी मालवण येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आरोपी आपटे, पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी
Published on

मुंबई/रत्नागिरी : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी, शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना गुरुवारी दुपारी मालवण येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी संशयित आरोपी आपटे आणि डॉ. पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

२६ ऑगस्ट रोजी राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यापासून जयदीप आपटे फरार झाला होता. पण १० दिवस झाले तरी पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती. कल्याण येथील राहत्या घरी पत्नी आणि आईला भेटायला आला असताना पोलिसांनी बुधवारी रात्री त्याला अटक केली. पत्नीकडूनच तो घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो पोलिसांच्या तावडीत अलगदपणे सापडला. तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

जयदीप आपटे हा कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात आला. कल्याणला उतरल्यावर जयदीप रिक्षा करून दूधनाका परिसरात उतरला. यावेळी जयदीपने डोक्यावर टोपी घातली होती आणि तोंडाला मास्क लावला होता. त्याच्या हातात दोन बॅग होत्या. टोपी आणि मास्क लावून जयदीप आपटे हा आपल्या राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात होता. मात्र, इमारतीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय पोलीस कोणत्याही रहिवाशांना इमारतीमध्ये सोडत नव्हते. जयदीप आपटे हा इमारतीपाशी आल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे आयडी कार्ड मागितले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा चेहरा पाहून हा जयदीप आपटेच असावा, असा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने आवाज दिला आणि घाबरलेल्या, भेदरलेल्या अवस्थेत असलेला जयदीप आपटे रडायला लागला. त्यावेळीच पोलिसांनी त्याला अटक केली.

जयदीपविरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूकआऊट नोटीसही जारी केली होती. अटक केल्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी सकाळी त्याला मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. त्यानंतर दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या दोन्ही संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जामिनाच्या तयारीची सूत्रे ठाण्यातून हलत आहेत -संजय राऊत

पुतळा दुर्घटनेनंतर शिवभक्तांचा राज्य सरकारवर इतका दबाव आणि रेटा होता की, जयदीप आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडले, ते यापूर्वी कधीही घडले नव्हते. जयदीप आपटे याच्यापेक्षा ज्यांनी त्याला हे काम अनुभव नसताना दिले, ते बेकायदेशीर होते. ते सूत्राधार आजही सरकारमध्ये आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार? सिंधुदुर्गच्या न्यायालयात त्याच्या जामिनाची तयारी आठ दिवसांपासून सुरू आहे. यासाठी ठाण्यातून सूत्र हलत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

आपटेवर कठोर कारवाई होणार -मुख्यमंत्री

पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. विरोधकांना आम्ही चपराक लगावली आहे. जयदीप आपटेची चौकशी केली जाईल. त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ज्यांनी राजकारण केले, तो प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणी संजय राऊतांना तर ठाण्यातल्या एका विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in