संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरला दणका; राज्य सरकारने प्रशिक्षण थांबवले, अकादमीत तातडीने परत बोलावले

वादग्रस्त ठरलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Published on

पुणे/मुंबई : वादग्रस्त ठरलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांचे जिल्हा प्रशासनाबाबतचे प्रशिक्षण स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना तातडीने लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे २३ जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस पदावर रूजू होणाऱ्या पूजा दिलीप खेडकर यांनी ‘यूपीएससी’च्या २०२२ च्या परीक्षेत देशात ८२१ ऑल इंडिया रँक मिळवली. या रँकवर ‘आयएएस’ पद मिळणे अवघड असतानाही पूजाने ते प्राप्त करण्यासाठी ओबीसी नॉन क्रिमिलेअर असल्याचे प्रमाणपत्र देऊन दृष्टिदोष आणि मानसिक आजार असल्याचे सांगितले होते. दिव्यांग किंवा ओबीसी आरक्षणाचा त्यांनी फायदा करून घेतल्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

प्रशिक्षण घेतलेल्या विभागांमध्येही त्यांनी गैरवर्तन केल्याचे अहवाल संबंधित विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे दिले आहेत. खेडकर या ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये नऊ महिने चार दिवस प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. नऊ दिवसांच्या संक्रमण कालावधीनंतर १५ एप्रिल ते ३१ मेपर्यंत (सात आठवडे) पुण्यातील यशदा येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. ३ जूनपासून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाला सुरुवात केली.

प्रशिक्षणार्थी असतानाच स्वतंत्र दालनाची मागणी, त्यासाठी माजी अधिकारी असलेल्या वडिलांचा वशिला, स्वतंत्र दालन, वाहन, शिपाई मिळत नसतानाही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अरेरावी करणे, आलिशान खासगी गाडीवरच लाल दिवा लावणे, असे अनेक आरोप पूजा यांच्यावर आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपल्या २६ पानी अहवालात पूजाचे किस्से नमूद केले आहेत.

पूजा खेडकर यांचे हे कारनामे उघड झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारनेही याबाबत खास चौकशी समिती नेमली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या सर्व तक्रारींनंतर केंद्र सरकारने अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून एक समिती स्थापन केली आहे. चौकशी सुरू असून या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही, मात्र आता त्यांचे प्रशिक्षण थांबवले गेल्याने खेडकर यांच्यासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.

लालबहादूर शास्त्री, मसुरीमधील या ॲकॅडमीने हा निर्णय घेतला आहे. या ॲकॅडमीकडून राज्य सरकारला अहवाल देण्यासंदर्भात आदेश देण्यात आला होता. राज्य सरकारने हा अहवाल पाठवला असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांना २३ तारखेपर्यंत मसुरी येथील ॲकॅडमीमध्ये हजर रहावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in