पेणमधील 'त्या' बेकऱ्यांवर केली कारवाई

ही बातमी ‘दै. नवशक्ति’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन रायगड विभाग खडबडून जागे झाले आहे.
पेणमधील 'त्या' बेकऱ्यांवर केली कारवाई

पेणमधील बेकरी व्यावसायिक नागरिकांच्या जीवाशी खेळून पैसे कमवित असल्याचे प्रकरण ‘दै. नवशक्ति’ने उघड केले होते. २ सप्टेंबर रोजी पावामध्ये उंदराची विष्टा आढळून आल्यानंतर त्यांनी पेणमधील दोन पत्रकारांना सोबत घेऊन पेण रामवाडी येथील पाच बेकरींचे स्टिंग ऑपरेशन केले आणि बेकरी व्यावसायिकांच्या उत्पादन कार्यपद्धतीचा भांडाफोड केला. ही बातमी ‘दै. नवशक्ति’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन रायगड विभाग खडबडून जागे झाले आहे.

‘नवशक्ति’च्या बातमीचा संदर्भ घेऊन ८ सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन रायगड विभागाने पेण रामवाडी येथील बेकऱ्यांचा पाहणी दौरा करून कारवाईला सुरुवात केली. सकाळी १०.०० वाजता सुरू झालेली कारवाई तब्बल ७ तास सुरू होती. या कारवाईत रामवाडी येथील ‘अमन स्टार बेकरी’ यांना व्यवसाय बंद करण्याचे लेखी निर्देश देऊन रुपये २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर ‘विशाल बेकरी’ (रामवाडी आर.पी. नगर) याच्या मालकास नोटीस देऊन बेकरी बांधकामात आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये योग्य ते बदल करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तसेच अन्न सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत स्वच्छता नियमांचे पालन करूनच व्यवसाय सुरू करता येईल, असे निर्देश बेकरी मालकांना दिले आहेत. पाव विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून प्रत्येकी १५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तर संबंधित हॉटेलचे ऑडिट करून हॉटेल मालकासही दंड भरण्यासाठी नोटीस देण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन रायगड विभाग अधिकारी निकम यांनी सांगितले.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन रायगड विभागचे अधिकारी निकम व त्यांच्या टीमने केली. यावेळी बेकरी व्यावसायिक आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांचे कागदपत्र, ओळखपत्र तपासण्यात आले. तसेच अावश्यक त्या कागदपत्रांची तपासणी केली.

दोषींवर कारवाई

बेकरी तसेच मिठाई व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. अन्न व औषध सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत व्यापाऱ्यांनी त्यांच्या कारखान्यात स्वच्छता राखने बंधनकारक आहे. तसेच नागरिकांनाही काही अनुचित आढळले तर तत्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयासोबत संपर्क करण्याचे आम्ही आवाहन करीत आहे. तपासणीअंती दोषींवर नक्कीच कठोर कारवाई केली जाईल.

- लक्ष्मण दराडे, सहाय्यक आयुक्त (अन्न) व पदावधित अधिकारी, रायगड

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in