उद्योजकांना त्रास झाल्यास ‘मकोका’अंतर्गत कारवाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

पुणे जिल्हा हे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचे माहेरघर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारची गुंतवणूक येत आहे.
उद्योजकांना त्रास झाल्यास ‘मकोका’अंतर्गत कारवाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट
एक्स @Dev_Fadnavis
Published on

पुणे : पुणे जिल्हा हे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचे माहेरघर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारची गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण ठेवणे महत्त्वाचे असून जिल्ह्यातील कोणत्याही उद्योग किंवा उद्योजकाला कसल्याही प्रकारचा त्रास झाल्यास थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. महाराष्ट्रात उद्योगांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, अशा सूचनादेखील फडणवीस यांनी केल्या.

फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे व उपक्रमांचे ई-भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराचे विस्तारीकरण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झाले. औद्योगिकीकरण वाढले, अनेक क्लस्टर तयार झाले. या ठिकाणी गुंतवणूकदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे सर्व होत असताना स्वतंत्र आयुक्तालयाची गरज निर्माण झाली. वेळोवेळी त्याबाबत मागणी होत गेली. ही मागणी आता पूर्णत्वाला जाणार आहे. २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराचे नवीन आयुक्तालय स्वतंत्र इमारतीमध्ये स्थलांतरित होईल. सुसज्ज, अत्याधुनिक आणि खासगी गृहनिर्माण धोरणालाही लाजवेल, असे अद्ययावत सरकारी कार्यालय निर्माण होणार आहे. अत्यंत निकडीची गरज म्हणून आयुक्तालयाची निर्मिती तीदेखील सीएसआर फंडाच्या माध्यमातून हे कौतुकास्पद आहे.

पुण्याच्या काही भागांमध्ये अधूनमधून उद्योजकांकडून काही तक्रारी येतात. जाणीवपूर्वक त्रास, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीच्या तक्रारी केल्या जातात. मात्र, यापुढे असे काहीही खपवून घेतले जाणार नाही. यामध्ये कोणत्याही पक्षाचा, कोणाचाही पदाधिकारी असू दे थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाई करा. पुणे हे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचे कॅपिटल आहे. त्यामुळे येथे उद्योगाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

एफडीआयमध्ये महाराष्ट्र अग्रेसर

थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात महाराष्ट्र जगात अग्रेसर असून महाराष्ट्र उद्योग विभाग यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतातील ३५ टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे. दावोसमध्ये महाराष्ट्राने १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक खेचून आणली. महाराष्ट्र शाश्वत औद्योगिक प्रगतीसाठी सज्ज आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in