दोषी आढळल्यास नक्की कारवाई करू! धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांनी केले स्पष्ट

बीड हत्याप्रकरणी चौकशी सुरू आहे, त्यात कुणीही दोषी आढळल्यास नक्की कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
अजित पवार, धनंजय मुंडे ( डावीकडून)
अजित पवार, धनंजय मुंडे ( डावीकडून)
Published on

मुंबई : बीड हत्याप्रकरणी चौकशी सुरू आहे, त्यात कुणीही दोषी आढळल्यास नक्की कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. सध्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही माझ्याकडे काही कागदपत्रे दिली आहेत. त्यात तथ्य आढळल्यास मुंडेंवर नक्की कारवाई करू, असे अजित पवार म्हणाले.

जो दोषी असेल त्याला पाठीशी घातले जाणार नाही. त्याच्यावर कारवाई होईलच आणि जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. असे सांगत अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रे माझ्याकडे दिली आहेत. मी ती कागदपत्रे पाहिली आहेत. ती कागदपत्रे तपासणीसाठी मी संबंधित यंत्रणांना दिली आहेत. त्यामध्ये काही तथ्य आढळले तर त्याबाबत नक्कीच कारवाई होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आमच्यात नैतिकता!

महायुतीमधील सर्व वरिष्ठ नेत्यांशी मी संपर्कात आहे. त्यामुळे खालचे कार्यकर्ते काय बोलतात, त्यावर उत्तर देण्यास मी बांधील नाही. आमच्या सरकारला इतरांनी कोणीही सल्ला देऊ नये. महायुती सरकारमध्ये नैतिकता आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, ही मागणी अजित पवार यांनी फेटाळून लावली. निर्दोष व्यक्तीवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई व्हायला नको, असे ते म्हणाले.

मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनी घ्यावा!

धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा निर्णय अजित पवार यांनी घ्यावा. धनंजय मुंडे आमच्या पक्षाचे नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संबंध येत नाही, असेही धस यांनी स्पष्ट केले.

परळी नगरपालिकेचे विशेष ऑडिट होणे गरजेचे

परळी नगरपालिकेचे विशेष ऑडिट होणे गरजेचे आहे. कारण एका-एका व्यक्तीच्या नावे ४६ कोटींची पाच-पाच बिले उचलली गेली आहेत. आरोपी विष्णू चाटेच्या नावेही पैसे उचलले गेले आहेत. सर्व माध्यमांना विनंती करतो की, तुम्ही कॅमेरा घेऊन परळीत फिरावे आणि कोणता रस्ता योग्य आहे, याचे प्रमाणपत्र तुम्हीच द्यावे, असे आवाहन सुरेश धस यांनी केले.

मंत्रिमंडळ बैठकीतून धनंजय मुंडे बाहेर पडले

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अर्ध्या बैठकीतून धनंजय मुंडे बाहेर पडले. दवाखान्यात काही चाचण्या करण्यासाठी जायचे आहे, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.

फडणवीस, अजित पवार निर्णय घेतील - मुंडे

मी राजीनामा द्यावा की नाही, मी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करावे. राजीनाम्याच्या विषयावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्या आहेत. ज्या कागदपत्रांसह त्यांनी ही भेट घेतली त्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस स्पष्ट उत्तर देतील. त्यांनीच यावर उत्तर द्यावे, अशी माझीही इच्छा आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

कराडच्या ‘त्या’ क्लीपची चौकशी करा - धस

वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून तो एका महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलत आहे. ऑडिओ क्लिपमध्ये कराड हा एका महिला पोलीस अधिकाऱ्याला आरोपीला सोडून देण्यास सांगत आहे. तसेच बीड जिल्ह्याचा मीच बाप आहे, असेही म्हणत आहे. नेमके प्रकरण काय? कराडने कोणत्या महिला पोलीस अधिकाऱ्याला फोन केला? तसेच तो कोणत्या आरोपीला सोडण्यास सांगत आहे? त्याची चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in