काँग्रेसला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्याने कार्यकर्ते नाराज; वर्षा गायकवाड यांची खंत

मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या, त्यात काहीही तथ्य नाही. जिथे पक्षाची ताकद आहे ती जागा आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते आणि त्यात काहीही चुकीचे नाही.
काँग्रेसला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्याने कार्यकर्ते नाराज; वर्षा गायकवाड यांची खंत
Published on

प्रतिनिधी/मुंबई

मुंबईत काँग्रेसची ताकद असल्याने आघाडीच्या काळात याआधी सहाही मतदारसंघात विजय मिळवला होता. यावेळी महाविकास आघाडी म्हणून जागावाटपात मुंबई काँग्रेसने तीन मतदारसंघांची आमची मागणी होती. पण काँग्रेसला दोनच मतदारसंघ मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये खंत आहे. विषेशतः मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत म्हणून कार्यकर्ते नाराज आहे, अशी कबुली मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिली. मात्र मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या, त्यात काहीही तथ्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

परंतु पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर आहे. मोदींच्या हुकूमशाही राजवटीला पराभूत करून जनतेचे राज्य आणणे हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य असून पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने मुंबईतील सहाही जागांवर विजयी मिळवण्यासाठी काम करु, अशी ग्वाही वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या, त्यात काहीही तथ्य नाही. जिथे पक्षाची ताकद आहे ती जागा आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते आणि त्यात काहीही चुकीचे नाही. काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाही आहे आणि मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मुंबई काँग्रेसची अध्यक्षा म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठीसमोर मांडल्या, तो माझ्या कर्तव्याचा भागच आहे. मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ती आहे. काँग्रेसचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाचा शिष्टाचार मानतो. पक्षाने एकदा भूमिका घेतली की पक्षाचे काम करणे ही माझी आणि माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार आपण केलेला आहे आणि येणाऱ्या काळात मुंबई काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला दिसेल. पक्षाची शिस्त आणि विचारधारा हे आमच्यासाठी महत्वाचे आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

यावेळच्या लोकसभा निवडणुका ह्या देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. देशाचे भवितव्य, आपल्या देशाची लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आहे. मागील १० वर्षांच्या अन्याय काळात समाजातील प्रत्येक घटकावर मोदी सरकारने अन्याय केला. या सरकारने फक्त आपल्या मित्रांचे खिसे भरण्याचे काम केले. धर्म-जाती-प्रांत-भाषेच्या नावावर समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप केले आहे. गोरगरिब, दलित, आदिवासी, मागास वर्गासाठी, महिला आणि तरुणांसाठी काहीही केलेले नाही. उलट दलित, महिलांवरील अत्याचार आणि अन्याय मोदी सरकारच्या काळात वाढला आहे. देशात इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे मुंबईतील आघाडीच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार आमच्या कार्यकर्त्यांचा आहे. मोदींची हुकूमशाही मोडून जनतेचे, न्यायाचे राज्य स्थापन करणे हाच आमचा उद्देश आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in