मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा आहुजा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. गोविंदाने आज (२८ मार्च) बाळासाहेब भवन येथे येथे आयोजित कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर गोविंदा उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. उत्तर-पश्चिम मुंबईमधून ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माझा १४ वर्षाच्या राजकीय वनवास संपला आहे, अशी प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे.
गेल्या १४ वर्षापासून गोविंदा हा राजकारणापासून दूर होता. पण आता शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाला आहे. यापूर्वी गोविंदाने २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी गोविंदाने भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. २००४ ते २००९ या काळावधीत गोविंदा खासदार राहिला होता.
१४ वर्षाचा राजकीय वनवास संपला - गोविंदा
गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्हणाले, मी २००४ ते २००९ या काळात राजकारणात सक्रीय होतो. पण यानंतर मी पुन्हा कधीच राजकारणात दिसणार नाही, असे वाटले होते. परंतु, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माझा १४ वर्षाचा राजकीय वनवास संपला आहे. मला पक्षाकडून दिलेले जबाबदारी इमानदारीने पार पाडेन", अशी प्रतिक्रिया गोविंदाने दिली.