पर्यावरण आणि वृक्षारोपण यासाठी काम करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. सध्या ते कराडमधील तासवडे येथे पुणे-बंगळुरु महामार्गाच्या रूंदीकरणात तोडल्या जाणाऱ्या झाडाची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करून पुनर्रोपणाचे काम ते करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत एक छोटा अपघात घडला. वृक्षारोपण करत असताना त्यांच्यावर मधमाश्यांचा हल्ला झाला.
पुनर्रोपणाचे काम करत असताना झाडाच्या एका फांदीवरील मधमाशांचे मोहोळ उठले आणि त्यांनी सयाजी शिंदे यांच्यासह उपस्थित असलेल्या लोकांवरही हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, सयाजी शिंदेंना मोठी दुखापत झालेली नसून ते किरकोळ जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना उपचारासाठी कराडमधील सह्याद्री रूग्णालयात दाखल झाले आहेत. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून अभिनेते सयाजी शिंदे हे वृक्ष लागवड आणि वृक्ष पुनर्रोपणासाठी गेली अनेक दिवस राज्यभर काम करत आहेत.