साताऱ्यात अदानींचे 'तीन' जलविद्युत प्रकल्प

अदानींच्या समूहाला पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांतील सह्याद्री पर्वतरांगेत तीन जलविद्युत प्रकल्प करण्यास केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे
साताऱ्यात अदानींचे 'तीन' जलविद्युत प्रकल्प

कराड : देशाच्या राजकीय पटलावर जागतिक उद्योगपती गौतम अदानींची चर्चा होत नाही, असा एकही दिवस नसतो. त्यातही अदानी आणि भाजप यांच्या 'अर्थपूर्ण' संबंधांवरूनही विरोधी पक्ष टिकेची झोड उठवत असतानाच राज्यातील अनेक मोठे प्रकल्प सध्या अदानींच्या ताब्यात आहेत. तर आता अदानींच्या समूहाला पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांतील सह्याद्री पर्वतरांगेत तीन जलविद्युत प्रकल्प करण्यास केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे; मात्र सदर परवानगी देताना केंद्राने कदाचित अदानींचे भाजपशी असलेल्या 'अर्थपूर्ण' संबंधांमुळे की काय पण अनेक पर्यावरण विषयक अनेक नियम, कायद्यांना धाब्यावर बसवले असल्याचा आरोप होत आहे.

आर्टिकल १४ या संस्थेने नुकताच याबाबतचा वृत्त अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये अदानी समूहाच्या एका कंपनीला केंद्र सरकारकडून सातारा, पुणे व कोल्हापूर जिल्हांमध्ये प्रत्येकी एक जलविद्युत प्रकल्प उभारण्याची प्राथमिक परवानगी जुलै २०२३ मध्ये देण्यात आली आहे; मात्र केंद्राने प्राथमिक परवानगी दिल्यात्नंतर आर्टिकल १४ या संस्थेने याबाबत केलेल्या सर्वेक्षणानुसार आणि केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञांनुसार या प्रकल्पांमुळे 'सह्याद्री'च्या जैववैविध्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिला असतानाही केंद्र सरकारने या जागतिक वारसा स्थळासारख्या संवेदनशील क्षेत्रात हे प्रकल्प उभारण्यास परवानगी दिली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे श्रमिक मुक्ती दलाने आता पासूनच या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यातील डांगीस्तेवाडी गावात गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून तारळी पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट उभारणीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. येथील तारळी नदीवरील तारळी धरण आणि आणखी एका अतिरिक्त जलाशयाची उभारणी करुन तब्बल १५०० मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पासंदर्भातील पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणीला उपस्थित राहून आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन केले आहे. त्यामुळेच अदानींचा डोळा अतिसंवेदनशील असलेल्या सह्याद्री पर्वत रांगांतील जैववैविविधतेवर गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्योजक गौतम अदानी यांच्या तारळी पीएसएचपी प्रकल्पाची उभारणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डांगिस्तेवाडी येथे प्रस्तावित आहे. बामनेवाडी, मुरुड येथील सध्याच्या तारळी धरणाचा खालील भागातील जलाशय म्हणून वापर करण्यात येईल. याशिवाय त्याच्या जवळ अजून पाटण तालुक्यातील निवडे गावात अजून एक अतिरिक्त धरण (जलाशय) बांधले जाणार आहे. त्याचा वापर वीज निर्मितीसाठी पाणीसाठा करण्यासाठी म्हणून केला जाईल. निवडे येथे ११.३६ एमसीएम(०.४० टीएमसी) पाणी साठवण क्षमतेचे धरण बांधले जाणार आहे,तर या धरणाच्या भिंतीची उंची ६१.५ मीटर असणार आहे.

श्रमिक मुक्ती दल करणार प्रकल्पास विरोध

- डॉ. भारत पाटणकर

पर्यावरण दृष्टीने सह्याद्रीचा पश्चिम घाटातील भाग हा अतिसंवेदनशील असल्याने त्याला या प्रकल्पांमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे श्रमिक मुक्ती दलाचा या प्रकल्पांना तीव्र विरोध असून, यातील तारळी पीएसएचपी १५०० मेगावॅटच्या प्रकल्पाबाबत येत्या १२ मार्च रोजी पाटण तालुक्यातील कळंबे गावात गगनगिरी महाराज मठ येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांना या प्रकल्पाबाबत सूचना आक्षेप नोंदवण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देखील देण्यात आला आहे. त्यामुळे या सुनावणीस श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी उपस्थित राहतील. जो काही प्रकल्प अदानी समूहाकडून उभारला जाणार आहे. त्याबाबत त्यांनी पर्यावरणाची जी काही हानी होणार आहे त्याचा विचार केला आहे का? आतापर्यंत हि माहिती राज्यातील व जिल्ह्यातील जनतेपासून का लपवून ठेवण्यात आली होती? याचा खुलासा अदानींनी करावा, असा सवालही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी सायंकाळी दै. ‘नवशक्ति’शी बोलताना उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in