Uddhav Thackeray : अयोध्येत आदर्शसारखा जमीन घोटाळा; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबईत झालेल्या आदर्श घोटाळ्यासारखाच घोटाळा अयोध्येत झाला आहे. अयोध्येतील जमीन लोढा खातोय, आपण जय श्रीराम करतो असे भगव्या सप्ताहानिमित्त आयोजित सभेत शनिवारी उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray
अयोध्येत आदर्शसारखा जमीन घोटाळा- उद्धव ठाकरे
Published on

ठाणे : मुंबईत झालेल्या आदर्श घोटाळ्यासारखाच घोटाळा अयोध्येत झाला आहे. अयोध्येतील जमीन लोढा खातोय, आपण जय श्रीराम करतो. कारसेवकांचे रक्त सांडायला काय लोढाचा टॉवर बांधायला दिले होते, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी विचारला.

भगव्या सप्ताहानिमित्त आयोजित सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्हाला भीक नको. आम्हाला कष्टाचा पैसा पाहिजे, असे शेतकरी म्हणतोय. आमचा हक्क हिरावला जात आहे. मी दौऱ्यावर होतो. काही शेतातील महिलांना विचारलं. त्यांना विचारलं खुश आहात ना. १५०० रुपये मिळत आहेत. ती म्हणाली, १५०० रुपयात घर चालतय का?

मुलांना शाळेत कसे घालू. आम्ही त्या महिलेच्या मुलाला शाळेत प्रवेश दिला. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. पुस्तकांवर जीएसटी. शिक्षणावर जीएसटी. आता आयुर्विम्यावर जीएसटी लावला. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. जाहिरात आहे ना. जिंदगी के बाद भी जीएसटी लावला आहे, असे ठाकरे म्हणाले.

मिंधे सरकार घोषणांचा पाऊस पाडतेय. अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. मिधेंचे कलेक्टर आहेत, चांडाळ चौकडी आहे. त्यांना तुरुंगाचे गज मोजायला लावू, असा इशारा देऊन ते म्हणाले की, ठाणे उभे राहिलं ते शिवसैनिकांच्या प्रेमामुळे. शिवसैनिकांनी मेहनत घेतली नसती तर मिंधेंची दाढी उगवली नसती. हे मोदींसमोर वळवळणारे मांडूळ आहे. रोज घालीन लोटांगण सुरु आहे", अशी टीका त्यांनी शिंदे यांचे नाव न घेता केली.

ठाकरे म्हणाले, मी ठाणेकरांचे कौतुक करण्यास करण्यास आलो आहे. सर्वकाही पळवलं तरी सव्वापाच लाख पाठीशी उभे राहिले. कल्याणमध्ये मिधेंचे कार्टे उभे होते, आमच्या शिवसैनिकाचा पराभव करण्यासाठी विश्वगुरुंना बोलवावे लागले. मुंबईमध्ये अमोल कीर्तिकरांची सीट ४८ मतांनी चोरली आहे. पदवीधरमध्ये शिवसैनिक निवडून दिला. कोकण माझंच आहे. मी अब्दाली का बोललो? रागाने नाही बोललो. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला. औरंगजेबाच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचे. तसे अब्दालीच्या खेचरांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतोय. तु्म्हाला महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे शिवसेना दाखवून देईल, असे आव्हान त्यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in