राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा; ‘त्या’ अभ्यासक्रमांची होणार अतिरिक्त सीईटी परीक्षा

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य सरकारने बीबीए, बीसीए, बीएमएस व बीबीएम या अभ्यासक्रमांची अतिरिक्त सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २९ मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेपासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य सरकारने बीबीए, बीसीए, बीएमएस व बीबीएम या अभ्यासक्रमांची अतिरिक्त सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने बीबीए, बीएमएस, बीबीएम व बीसीए अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचे निर्देश परिषदेने सीईटी सेलला दिले आहेत. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २९ मे रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ५६ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ४८ हजार १३५ विद्यार्थी परीक्षेला बसले. परीक्षेबाबत माहिती नसल्याने या प्रवेश परीक्षेला असंख्य विद्यार्थी बसले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे अतिरिक्त परीक्षा घेण्याची मागणी केली होती. या नुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्य सरकारला अतिरिक्त परीक्षा घेण्याबाबत प्रस्ताव दिला होता.

या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली असल्याने बीबीए, बीसीए, बीएमएस व बीबीए या अभ्यासक्रमांची अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेबाबत सीईटी कक्षाने प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचना पाहण्यासाठी सीईटीच्या संकेस्थळाला भेट देण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. या अभ्यासक्रमांची अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार असल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in