मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महायुती सरकारने विचारपूर्वक आणली आहे. एक दीड वर्षापासून लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून पूरग्रस्तांना मदत करणे याला महायुती सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे काही योजनांवर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूरस्थिती आणि नुकसानग्रस्तांना मदत यामुळे राज्य सरकारच्या काही विभागांवर आर्थिक ताण येऊ शकतो, असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
लाडकी बहिण योजना महायुती सरकारने आणली आहे. महिला या योजनेमुळे खूप खूश आहेत; ही योजना एक वर्षापासून सुरू असून, राज्य सरकारने वार्षिक बजेटचा विचार करूनच मंजूर केली आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा फटका प्रत्येक विभागाला बसणार आहे. लाडकी बहिण योजनेव्यतिरिक्त इतर महत्त्वाचे आर्थिक घटकही आहेत, त्यामुळे आमच्या विभागासह प्रत्येक विभागाला तडजोड करावी लागणार आहे. अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रातील शेतक-यांना व नागरिकांना नुकसान भरपाई देणे, विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणणे हे सध्या प्राधान्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
निधी मिळाल्यानंतर दिवाळीचा लाभ
सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणींना लाभ मिळावा असा सरकारचा प्रयत्न आहे. महिला बालकल्याण विभागाकडून प्रक्रिया मान्यतेसाठी दिली आहे, त्या कालावधीत निधी प्राप्त व्हावा, अशी अपेक्षा आहे. ज्या क्षणी निधी प्राप्त होईल त्यावेळी लाभ वितरीत केला जाईल, असे ही त्या म्हणाल्या.
भुजबळांची कबुली
लाडकी बहिण योजनेमुळे अन्य योजनांवर आर्थिक ताण येत असल्याची कबुली महायुतीतील मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच दिली. त्यापाठोपाठ आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही मंत्री भुजबळ यांच्या हो ला हो म्हणत दुजोरा दिला आहे.