विधानसभेत आदित्य ठाकरे आणि मुनगंटीवारांमध्ये जुंपली , 'लाज' शब्दावरून गदारोळ

अडीच वर्षे कोणाची सत्ता होती. तेव्हा आम्ही म्हणू का तुमच्या वडिलांना लाज वाटते का, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला
विधानसभेत आदित्य ठाकरे आणि मुनगंटीवारांमध्ये जुंपली , 'लाज' शब्दावरून गदारोळ

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. आदिवासी विभागाशी संबंधित विषयावर आदित्य ठाकरे हे मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले. आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी राज्यात कुपोषणामुळे एकाही बालकाचा मृत्यू झालेला नाही, असे सांगताच विधानसभेत जोरदार गदारोळ सुरू झाला. कुपोषणाच्या मुद्द्यावर आदिवासी मंत्र्यांकडून मिळालेल्या उत्तरावर आम्ही समाधानी नसल्यामुळे आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून आम्ही विधानसभेवर बहिष्कार टाकत असून सर्व आमदारांनी विधानसभेवर बहिष्कार टाकल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली.

नेमका वाद कुठून सुरु झाला ?

आदिवासी मंत्र्यांच्या उत्तरानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील ज्येष्ठ सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. आपण आदिवासी समाजासाठी काहीच करू शकलो नाही याची लाज वाटायला हवी असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत हा असंसदीय शब्द असल्याचे सांगितले. मुनगंटीवार म्हणाले की, अडीच वर्षे सत्तेत होते, वडिलांना लाज वाटली असे म्हणायचे का?

एकाही बालकाचा मृत्यू कुपोषणामुळे झाला नसल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी सभागृहात दिली. याबाबतची सर्व माहिती उच्च न्यायालयात दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर काँग्रेसचे आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेत मंत्र्यांचे उत्तर असंवेदनशील असल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले. संसदीय भाषा वापरली पाहिजे, असे सांगताना मुनगंटीवार यांचा संताप वाढला. लाज हा शब्द वापरू नये. अडीच वर्षे कोणाची सत्ता होती. तेव्हा आम्ही म्हणू का तुमच्या वडिलांना लाज वाटते का, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ झाला. यावेळी जयंत पाटील आदित्य ठाकरे यांच्या मदतीला धावून आले. यावेळी अध्यक्षांनी लाज हा असंसदीय शब्द असल्याचे सांगून ते तपासून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in