उद्योग परराज्यात गेल्याने सरकार तोंडघशी : आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात उद्योगासाठी योग्य वातावरण नाही, टाटा अधिकाऱ्याने सांगितल्याचा फडणवीसांचा दावा, आदित्य ठाकरेंनी दिलं आव्हान
उद्योग परराज्यात गेल्याने सरकार तोंडघशी : आदित्य ठाकरे

मागील तीन महिन्यांत राज्यातील ५ प्रकल्प परराज्यात गेल्याने शिंदे-फडणवीस राज्य सरकार तोंडघशी पडले आहे. म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रकल्प बाहेर जाण्यास पूर्वीचे महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा खोटा दावा त्यांनी केला. त्यासाठीचा पुरावा म्हणून फडणवीस त्यांनी काही जुन्या बातम्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या, पण देवेंद्र फडणवीसांनी दिलेली माहिती खोटी आहे, असा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

वास्तविक पाहता याबाबतचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षित होते, मात्र ते उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे खरे अधिकार कोणाकडे आहेत, हे जनतेच्या लक्षात आले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावे, असं खुलं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिलं. आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आदित्य म्हणाले, "पत्रकार परिषदेत एवढे खोटे बोलल्याचे मी कधीही ऐकले नव्हते किंवा पत्रकार परिषदेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या टीमकडून चुकीची माहिती दिली जात आहे,"

वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस, बल्क ड्रग पार्क अशी बाहेर गेलेल्या उद्योगांची यादी मोठी आहे. हे सगळे उद्योग गेल्यावर आम्हाला उत्तर दिले होते की आपल्या राज्याला यापेक्षा खूप मोठा प्रोजेक्ट मिळणार आहेत. आकडे कसे बदलायचे आणि घटनाबाह्य सरकार कसे आणायचे ते यांना माहीत आहे. आज महाराष्ट्राला जो प्रकल्प मिळाला आहे, तो दोन हजार कोटींचा आहे. मला हे माहीत नव्हते की १ लाख ४९ हजार कोटींपेक्षा हा आकडा मोठा आहे, असा टोला आदित्य यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते किंवा जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा २ हजार कोटी एवढ्या छोट्या रकमांच्या घोषणा करत नव्हते. आता ती घोषणाही केली गेली आहे. यात सर्व काही आहे, असा दावा आदित्य यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. ते एका अर्थाने बरेच झाले. त्यामुळे त्यांना कुणाच्या हातून माइक खेचण्याची किंवा कुणाला चिठ्ठी द्यायची वेळ आली नाही. एवढेच नाही, तर आज मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतल्याने राज्यात वजन कुणाचं जास्त आहे हे दिसून आलं, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in