मविआत वाढती दरी; आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, केजरीवालांची भेट; मात्र शरद पवारांची भेट टाळली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.
मविआत वाढती दरी; आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, केजरीवालांची भेट; मात्र शरद पवारांची भेट टाळली
एक्स @ShivSenaUBT_
Published on

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मात्र, या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेणे टाळल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत दरी वाढू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरकार, सत्ता येत जात असते. परंतु नाते मात्र कायम राहणार आहे. हेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात आहे. हेच सांगण्यासाठी मी दिल्लीला आलो होतो. केजरीवाल यांच्या सरकारने गेल्या १० वर्षांत दिल्लीमध्ये जे काम केले, ते सर्व लोकांना माहीत आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली, त्यात निवडणूक आयोगाचा मोठा हात आहे. आयोगाचा भाजपला आशीर्वाद होता. त्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाचे आभार व्यक्त करणे गरजेचे आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला. मात्र, जल्लोष नाही, गाजावाजा नाही. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले ते र्इव्हीएम मशीनमुळे हेच प्रतीत होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ४७ लाख मतदार वाढले कसे, याचे उत्तर राज्य निवडणूक आयोग देत नाही. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानात घोटाळा झाला हे लोकांसमोर आणणे गरजेचे असून, माझे मत कुठे गेले हे मतदारराजाला कळले पाहिजे, असे ते म्हणाले.

कौतुक कुणाचे करायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न

एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार संजय दिना पाटील उपस्थित असल्याबाबत प्रश्न विचारला असता, ‘कोणाला कुणाचे कौतुक करायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

‘शिव भोजन थाळी’ बंद करण्याचा घाट

गोरगरीब गरजू लोकांसाठी ‘शिव भोजन थाळी’ योजना अंमलात आणली. मात्र लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे आता ‘शिव भोजन थाळी’ बंद करण्याचा घाट महायुती सरकारने घातला आहे. शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजनात अंडी, खीर देण्यात येते. मात्र, त्यावरही गंडांतर येणार असून अंडी, खीर देण्यासाठी राज्य सरकारकडे ५० कोटी नाहीत, असा टोला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीला लगावला.

...तर लाडकी बहीण योजना बंद होणार

राज्यात महायुतीला जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला. मात्र, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, मंत्रिपदासाठी धुसफूस, पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. ओढूनताणून राज्यात सत्ता आली, सत्तेत येण्याआधी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, असे महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले होते. लाडकी बहीण योजना सध्या सुरू राहील, मात्र बिहार निवडणूक आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर ही योजना बंद होणार, असे भाकीत आदित्य ठाकरे यांनी केले.

शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला जाण्याची परवानगी घ्या!

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदे गटाच्या स्नेह भोजनाला गेल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची भेट घेतली. शिंदे गटाकडून स्नेह भोजनाचे आमंत्रण आल्यास आधी परवानगी घ्या, असे आदित्य ठाकरे यांनी सेनेच्या खासदारांना ठणकावल्याचे सेनेतील नेत्यांनी सांगितले.

पळून जाणारे आता ‘जय गुजरात’ म्हणणार!

कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले राजापूर विधानसभा मतदारसंघातील राजन साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हे पळून जाणारे आता ‘जय गुजरात’ म्हणणार, असा टोला आदित्य ठाकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांना लगावला.‌ पक्ष फोडायचे फोडा, भ्रष्ट घ्यायचे ते घ्या, ज्यांना फोडायचे त्यांना फोडा, पक्ष फोडणे, बाळासाहेबांचे विचार चोरणे, महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक दुसऱ्या राज्यात पाठवणे हे पाप एकनाथ शिंदे यांनी केले आहे. शिंदे महाराष्ट्रद्रोही नव्हे तर देशद्रोही आहेत, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

logo
marathi.freepressjournal.in