

नागपूर : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाल्यावर पहिलाच दिवस आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवणारा ठरला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही विरोधी पक्षनेत्याविना हे अधिवेशन होत असल्यामुळे महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले. मात्र, सोमवारी आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षनेतेपदासाठी उत्सुक आहेत, असा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने या वादाला नवे वळण दिले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटावर शरसंधान साधत ‘कुणाचे तरी २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेत,’ असे वक्तव्य करत राजकीय खळबळ उडवून दिली. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. शोकसभा प्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपद हे घटनाबाह्य असल्याचे सांगत ते पद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरून शिंदे सेनेकडूनही ठाकरे गटाला डिवचण्यात आले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि वातावरण तापायला सुरुवात झाली. शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याचे शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले. त्यावर आदित्य ठाकरे यांनीही खुलासा करत या पेरलेल्या बातम्या असल्याचे स्पष्ट केले.
“अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. ही पेरलेली बातमी आहे. पण मीच कुणाचे तरी २२ आमदार दुसरीकडे जात असल्याचे ऐकले आहे,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. त्यावर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “ठाकरे पक्षाचे १३ आमदार माझ्या संपर्कात आहेत. या सगळ्या आमदारांची नावे माझ्याकडे आहेत, वेळ आल्यावर ती नावे सांगेन. हे सर्व आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यपद्धतीला वैतागले असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.”
आदित्य ठाकरेंनी केलेला दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. “आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यात कोणतेही तथ्य नाही. उद्या कुणी असेही म्हणेल की, आदित्य ठाकरेंचे २० आमदार भाजपच्या गळाला लागलेत. असे उगीच काहीतरी म्हटल्याने काहीही होत नाही. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना आमचा मित्रपक्ष आहे. ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे मित्रपक्षांना पक्षात घेण्याचे कारण नाही. आम्ही तसे राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे, यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत. निश्चितपणे भविष्यात आमची महायुती अजून मजबूत होताना दिसेल,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून उत्सुक असलेल्या भास्कर जाधव यांनीही आपण आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करू, असे स्पष्ट केले. “सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटत आहे. विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधीलच सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील, अशी भीती त्यांना वाटतेय. त्यामुळेच सरकार विरोधी पक्षनेत्याबाबत कोणताही निर्णय घेत नाही. आदित्य ठाकरेंसाठी मी विरोधी पक्षनेतेपदाचा एका क्षणात त्याग करेन,” असेही शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
७५,२६८.३८ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
राज्यात भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र शासनाकडून ५० वर्षे बिनव्याजी कर्ज म्हणून ४,४३९ कोटी; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ६ हजार १०३.२० कोटी; अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई व आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून १५ हजार ६४८ कोटी; कृषिपंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग ग्राहकांना शुल्क सवलत, सामूहिक प्रोत्साहन योजनेसाठी ९ हजार २५० कोटींची तरतूद अशा सुमारे ७५ हजार २६८.३८ कोटींच्या पुरवणी मागण्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात सादर करण्यात आल्या. दरम्यान, ७५,२८६.३८ कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार ६४,६०५.४७ कोटींचा आहे. गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात ५७ हजार ५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, सुरू असलेले विविध प्रकल्प यामुळे यंदा खर्चात वाढ झाली आहे.