होऊन जाऊ द्या...आज पुन्हा सांगतो, तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान

आज पुन्हा सांगतो तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो, होऊन जाऊ द्या, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा डिवचलं आहे.
होऊन जाऊ द्या...आज पुन्हा सांगतो, तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान
Published on

शिवसेनेत पडलेल्या उभ्या फूटीनंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वारंवार शिंदे गटाला डिवचत असतात. आदित्य यांनी मुख्यमंत्री यांना तुम्ही वरळीतून निवडणूक लढा किंवा मी ठाण्यातून निवडणूक लढवतो, असं आव्हान दिलं होतं. यानंतर आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. आज पुन्हा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं आहे.आधी अनेक वेळा सांगितलं, आज पुन्हा सांगतो तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो, होऊन जाऊ द्या, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा डिवचलं आहे.

यांनी आपल्या राज्यात लोकशाही मारलेली आहे. आज निवडणुका होत नाही याला आपण लोकशाही म्हणतो का? मी मुख्यमंत्र्यांना अनेकदा सांगितलं तुम्ही पदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर वरळीतून लढा नाहीतर मी तुमच्यासमोर ठाण्यातून लढतो, असं आदित्य म्हणाले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर आहेत. धारावीचा विकास होताना एका व्यक्तीचा विकास नको. हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरतं. निवडणुका होत नाहीत, पुणे चंद्रपुरात निवडणुका नाही, सिनेटची निवडणूक देखील घेत नाही, यांच्यात हिंमत नाही. हे घटनाबाह्य सरकार आहे. ते म्हणाले, अधिवेशनात अनेक विषय चर्चेला येत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना इतर राज्यात हाजीर रहा असं सांगितलं म्हणून ते राजस्थानला गेले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे महत्वाच्या चर्चेला नव्हते. काल मी AI चा मुद्दा उचलला. एआय हा मोठा घटक आहे. आरोग्य शिक्षणासाठी एआय महत्वाचं आहे. AI मुळे गुन्हे वाढू नये, देवेंद्र फडणवीस म्हणाले सरकार कायदा तयार करत आहे. AI वापरायचं कसं यावर कशी चर्चा होईल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर त्यांनी लोकशाहीत कोणाला कुठेही निवडणूक लढवण्याची मुभा आहे, असं उत्तर दिलं होतं. आदित्य यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिल्याने ते यावर काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in