ठाकरे गटाला आणखी एक धक्का! आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात, उद्या करणार पक्षप्रवेश

त्यांनी ट्विट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे
ठाकरे गटाला आणखी एक धक्का! आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात, उद्या करणार पक्षप्रवेश

ठाकरे गटाकडून १ जूलै रोजी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, त्याच दिवशी ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. कनाल हे उद्या अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वत: ट्विट करत पक्षावर (ठाकरे गटावर) नाराजी व्यक्त केली आहे. या ट्विट मध्ये त्यांनी पक्षाला जाहीर रित्या जय महाराष्ट्र करत असल्याचं म्हटलं आहे.

ट्विट करत राहुल कनाल म्हणाले की, "दु:ख होतंय!!! हे कोणी केलंय हे चांगलंच माहिती आहे. पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं. त्यांना न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे आणि तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही, ज्यांनी रात्रंदिवस काम केलंय. तरीही चलो अच्छा है. सबको पता चले की इगो और अॅरोगन्स क्या होता है!!!" अशी खदखद राहुल कनाल यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

राहुल कनाल हे उद्या शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार आहेत. ते आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने युवासेनेकडून वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली आहे. युनासेनेच्या मध्यवर्ती कार्यलयाकडून ही अधिकृत बातमी देण्यात आली आहे.

ऐन मुंबईतील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राहुल कनाल यांनी पक्षाला ठोकलेला रामराम हा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचा शिंदे गटात होणारा प्रवेश हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर युवासेनेकडून वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थिगिती देण्यात आली आहे. राहुल कनाल यांनी याच इन्स्टाग्राम पोस्टचा स्क्रिन शॉट्स शेअर करत नाराजी व्यक्त करणारं ट्विट केलं आहे. यात त्यांनी एकप्रकारे पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचं जाहीर केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in