­­­बी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चुरस, प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; उपलब्ध जागांच्या तुलनेत दुप्पट विद्यार्थी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) बी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) बी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यात ३४ हजार ८३० जागा उपलब्ध असून, तब्बल ७२ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यामुळे उपलब्ध जागांच्या तुलनेत दुप्पट विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक असल्याने अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस होणार आहे.

सीईटी कक्षामार्फत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा प्रवेश परीक्षा वेळेत पार पडल्या मात्र विविध कारणांनी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती. अखेर काही दिवसांपासून अनेक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सीईटी कक्षाने १२ जुलै रोजी सात अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर आता १३ जुलैपासून बी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरू केली आहे. पुन्हा बी. एड. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. यंदा प्रवेशासाठी ३४ हजार ८३० जागा उपलब्ध असून, तब्बल ७८ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७२ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बी.एड. अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी कक्षाकडून १३ जुलैपासून अर्ज नोंदणीसाठी सुरुवात करण्यात आली आहे.

१३ ते २० जुलैपर्यंत अर्ज भरता येणार

विद्यार्थ्यांना १३ ते २० जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना २४ जुलैपर्यंत कागदपत्रांची छाननी करून अर्ज निश्चित करायचा आहे. १६ जुलै रोजी तात्पुरती यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर २९ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना यादीवर हरकती नोंदवता येतील. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in