
गिरीश चित्रे / मुंबई
राज्यातील जनतेच्या जीवाशी खेळ मांडला असून भेसळयुक्त औषध पुरवठा होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीतून समोर आले आहे. बीड, नांदेड, नागपूर, भिवंडी, ठाणे आदी शासकीय रुग्णालयांतील औषधांची तपासणी करण्यात आली. यात औषधांमध्ये औषध असा घटकच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे समोर आणली. दरम्यान, या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात येणार असून औषधांची ऑर्डर देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.
राज्यात विविध सरकारी महाविद्यालय व रुग्णालयामध्ये भेसळयुक्त औषधांचा पुरवठा झाल्याचा गंभीर प्रकार २५ जानेवारी २०२५ रोजी निदर्शनास आला. या औषधांमध्ये अपेक्षित असलेले कोणतेही घटक समाविष्ट नसून, गुणवत्ता निकषांची चाचणी केली असता त्यात आरोग्यासाठी हानिहारक अशा घटकांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. या भेसळयुक्त औषधांमध्ये डायोक्लोफीनेंक, मिडीयाआझोलम,डेक्सामिथसोन, मिझोप्रोस्टॉल इत्यादी औषधांचा समावेश असल्याचे आढळून आले. डायक्लोफिनॅकच्या ४५००, डेक्सामिथसोनच्या ५११५, तर मिडीयाआझोलमच्या १५४० गोळ्यांचा समावेश असून नांदेडमधील सरकारी रुग्णालयातून सुमारे १ लाख २८ हजार रुपये किमतीच्या गोळ्या सील करण्यात येऊन सदरहू गोळ्या प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येणे, तसेच निस्तल फार्मालेश या कंपनीच्या सुमारे १४, ७९३ बनावट गोळ्यांचा साठा सील करण्यात आला. मात्र किती रुग्णांनी औषधे घेतली त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नसणे हे आश्चर्यकारक आहे. तरी या औषध भेसळ प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन व सखोल चौकशी करुन संबंधित दोर्षीविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.
दरम्यान, सर्वश्री, सुनिल प्रभू, काशिनाथ दाते, रोहित पवार, प्रकाश आबिटकर सोळंके, विकास ठाकरे, रईस शेख यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम, १०५ अन्वये लक्षवेधी सूचना उपस्थित केली.
भेसळयुक्त औषध पुरवठा हे प्रकरण गंभीर असून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी औषधांची तपासणी करण्यात येत असते. मात्र सुनील प्रभू यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेद्वारे माहिती समोर आणली असून यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक आयोजित करत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर
महाराष्ट्रात औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या, औषध पुरवठा करणारे वितरक आहेत; तरी उत्तराखंड येथून औषध पुरवठ्यासाठी ऑर्डर देण्याची काय गरज आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वोकल फॉर लोकल अशी संकल्पना राबवली; मात्र आपल्याकडून नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा घरचा आहेर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिला.
अन्न व औषध प्रशासन विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग एकमेकांशी संबंधित असून एखाद्या गोष्टीत कारवाई करण्याचे अधिकार मंत्र्यांना आहेत, असे सांगत मुनगंटीवार यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना चिमटा काढला.