"तुम्हाला ७ जागांवर पाठिंबा देऊ, पण ठाकरे गट आणि राष्ट्रवादी..."; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिले पत्र

आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली असून, हा प्रस्ताव केवळ सदिच्छा नाही, तर भविष्यात...
"तुम्हाला ७ जागांवर पाठिंबा देऊ, पण ठाकरे गट आणि राष्ट्रवादी..."; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिले पत्र

विशेष प्रतिनिधी / मुंबई

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले होते. परंतु, ते सातत्याने नवनव्या अटी आणि शर्ती समोर ठेवत असल्याने मविआ नेत्यांना त्यांच्याबद्दल साशंकता होती. त्यामुळे अखेरच्या क्षणी ४ जागा देण्याची तयारी मविआने दाखविली आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत आपला निर्णय कळवावा, असे सांगितले. त्यावर आता ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करीत महाविकास आघाडीत आपल्याला डावलले गेले असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले असून, भविष्यात एकत्रित येण्याच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला ७ जागांवर पाठिंबा देऊ इच्छितो, असे म्हटले आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील आपला विश्वास उडाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

महाविकास आघाडीच्या अखेरच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या ४ जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यापुढे महाविकास आघाडीची बैठक होणार नाही. त्यामुळे यावर विचार करून वंचित बहुजन आघाडीने निर्णय घ्यावा, असे कळविण्यात आले होते. मात्र, त्यावर कुठलाही प्रतिसाद वंचितने दिला नाही.

अखेर सोमवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मंगळवारी रात्रीपर्यंतची वेळ देत महाविकास आघाडीत सामील होण्याविषयी कळवावे, असे म्हटले होते. त्यावर मंगळवारी ॲड. आंबेडकर यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीत आम्हाला डावलल्याचा आरोप केला. आता महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आमचा विश्वास राहिला नाही. असे सांगत त्यांनी राज्यातील ७ मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पाठिंबा देईल, असे कळविले आहे. त्यामुळे आता यावर काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो, हे पाहावे लागेल.

निमंत्रित न करता बैठका घेतल्या

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये सातत्याने डावलले गेले. जागावाटपाच्या बैठकांत अनेकदा आम्हाला निमंत्रित न करताच बैठका घेतल्या गेल्या. आम्हाला त्याचे निमंत्रणही दिले गेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटावरील आमचा विश्वास उडाला असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे. इंडिया आघाडीची १७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे जाहीरसभा झाली. या सभेत राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप झाला. या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले होते. यानिमित्ताने आपल्याला आणि राहुल गांधी यांना भेटल्याचा आनंद झाला, असेही आंबेडकर यांनी खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

भविष्यातील आघाडीसाठी मित्रत्वाचा प्रस्ताव

ॲड. आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली असून, हा प्रस्ताव केवळ सदिच्छा नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते हा प्रस्ताव स्वीकारणार का, हे पाहावे लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in