प्रचार कालावधीनंतर जाहिरातींवर बंदी; राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अधिकृत प्रचार कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच इतर सर्व माध्यमांमधील निवडणूकविषयक जाहिरातींवर पूर्ण बंदी राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी दिली.
प्रचार कालावधीनंतर जाहिरातींवर बंदी; राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
प्रचार कालावधीनंतर जाहिरातींवर बंदी; राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अधिकृत प्रचार कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच इतर सर्व माध्यमांमधील निवडणूकविषयक जाहिरातींवर पूर्ण बंदी राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी दिली.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सांगितले की, निवडणूक प्रचार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपेल. त्यानंतर कोणत्याही माध्यमातून निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत.

मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी राहील. संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार मतदान संपण्याच्या ४८ तास आधी, म्हणजेच १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रचार कालावधी संपतो.

प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित माध्यमातील जाहिरातींसाठी पूर्वपरवानगी किंवा प्रमाणपत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

मार्गदर्शक आदेश :

राज्य निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ‘Media Monitoring and Advertisement Certification Order for Election Purposes, 2025’ या आदेशात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्यात आली आहेत.

महत्त्वाचे नामनिर्देशन मुद्दे

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकणी यांनी बैठकीत सविस्तर सादरीकरण करताना काही बाबी स्पष्ट केल्या :

  • उमेदवाराचे नाव संबंधित महापालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक

  • प्रस्तावक व अनुमोदक हे त्याच प्रभागातील असावेत

  • पक्षीय व अपक्ष उमेदवारांना एक प्रस्तावक व एक अनुमोदक आवश्यक

  • उमेदवार एकाहून अधिक प्रभागांतून नामनिर्देशन अर्ज दाखल करू शकतो

  • निवडणूक फक्त एका जागेवरूनच लढवता येईल

  • एका जागेसाठी कमाल चार नामनिर्देशन अर्ज दाखल करता येतील

logo
marathi.freepressjournal.in