पुण्यात पोर्श कारनंतर आणखी एक अपघात, सीरम कंपनीच्या मर्सिडीज कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं

मर्सिडीजच्या चालकानं ब्रेक मारला, पण तोपर्यंत गाडी केदार यांच्या अंगावरून गेली होती.
पुण्यात पोर्श कारनंतर आणखी एक अपघात, सीरम कंपनीच्या मर्सिडीज कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं
Published on

पुणे: पोर्श कार प्रकरण ताजं असतानाच पुण्यात एका अलिशान मर्सिडीज बेंज कारनं एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील येरवडा गोल्फ क्लब चौकात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिसांनी मर्सिडीज बेंजच्या चालकाला अटक केली असून ही मर्सिडीज बेंज कार सीरम कंपनीच्या मालकीची असल्याचं समोर आलं आहे.

'ती' मर्सिडीज कार सीरम कंपनीच्या मालकीची-

आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुण्यातील येरवडा गोल्फ चौकात सीरम कंपनीच्या मालकीच्या मर्सिडीज कारनं दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुरिअर बॉयला चिरडलं. केदार चव्हाण (वय ४१) असं दुचाकीस्वाराचा नाव असून या अपघातात तो ठार झाला. या अपघातानंतर येरवडा पोलिसांनी मर्सिडीज बेंजचा चालक नंजू उर्फ अर्जुन ढवळे याला ताब्यात घेतलं आहे.

केदारची गाडी घसरली अन्...

आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास केदार हे पुण्यातील येरवडा गोल्फ कोर्स चौकातून जात होते. मात्र त्यांची गाडी घसरल्यामुळं ते रस्त्यावर पडले. तेवढ्यात पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज थेट त्यांच्या अंगावरून गेली. मर्सिडीजच्या चालकानं ब्रेक मारला, पण तोपर्यंत गाडी केदार यांच्या अंगावरून गेली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते मर्सिडीज कारचा वेग जास्त होता, त्यामुळं केदार यांना जीव वाचवण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान पोलिसांनी कार चालक नंजू उर्फ अर्जुन ढवळे याला अटक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in