राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसैनिक आक्रमक ; मुंबई-गोवा महामार्गावर केलं आंदोलन

मनसे कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली. यावेळी प्रतिकात्मक म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसैनिक आक्रमक ; मुंबई-गोवा महामार्गावर केलं आंदोलन
ANI

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पनवेल येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन सरकारवर टीका केली. यावेळी राज ठाकरेंनी भविष्यात रस्ता बनवताना दहशत बसेल असं आंदोलन करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांचं पनवेल येथील भाषण संपताच मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन सुरु केलं. मनसेचे स्थानिक पदाधिकारी जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं.

मनसे कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली. यावेळी प्रतिकात्मक म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली. मनसेने कोणतीही पुर्वसुचना न देता केलेल्या या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. मनसेचे पदाधिकारी जितेंद्र पाटील यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही वृक्षारोपण करत आहोत. खड्ड्यांमुळे जो त्रास लोकांना होतोय त्यासाठी सरकार आणि ठेकेदार जबाबदार असल्याचं सांगितलं.

काही मिनिटांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथे केलेल्या भाषणात मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हे आंदोलन करण्यात आलं. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला पाहीजे अशी आमची मागणी असल्याचं जितेंद्र पाटील म्हणाले. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात आंदोल तीव्र करण्याचा इशारा देखील मनसेकडून यावेळी देण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in