बारामती : आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती, मात्र बारामतीहून सायंकाळी ५ वाजता दूरध्वनी आल्याने महाविकास आघाडीने (मविआ) या बैठकीवर बहिष्कार टाकला, असा आरोप राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांचा नामोल्लेख न करता केला.
जेव्हा सामाजिक प्रश्न निर्माण होतात, तेव्हा शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याने बैठकीला येऊन मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. जाणूनबुजून बहिष्कार टाकावयाचा आणि त्यानंतर सल्ला द्यावयाचा हे योग्य नाही, असे भुजबळ यांनी बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत सांगितले. विरोधकांना विश्वासात घेण्यात आले नाही, असे कारण देऊन महाविकास आघाडीचे नेते सर्वपक्षीय बैठकीकडे फिरकले नाहीत, असा दावा ते करीत असले तरी बारामतीहून सायंकाळी ५ वाजता दूरध्वनी आल्यानेच ते बैठकीपासून दूर राहिले, असे भुजबळ म्हणाले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना बैठकीला हजर राहण्यास आपण सांगितले. इतकेच नव्हे, तर शरद पवार यांनाही बैठकीसाठी घेऊन यावे असेही आपण आव्हाड यांना सांगितले होते, असे भुजबळ म्हणाले.
ओबीसींनी तुमचे काय घोडे मारले!
तुमचा राग हा अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, पण मग ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले आहे, असा सवालही छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला. ते म्हणाले की, बारामतीमध्ये माळी, मराठा, धनगर समाजाने तुम्हाला मते दिली. पण सगळ्यांच्या बाबतीत तुमची भूमिका काय, हे का सांगत नाही.