स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; एसटीत 'एआय'चा वापर, चालकांवरही नजर; लालपरीसह सर्व बस 'स्मार्ट'

नवीन लालपरीसह येणाऱ्या सर्व बसेसमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, एलईडी टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ ॲॅनलाइज यंत्रणा, याबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञानवर आधारित, बस लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत, तर स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून चालकावरही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. हे कॅमेरे एआय तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत.

नवीन ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बोलावलेल्या बसबांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व संबंधित खाते प्रमुखांसह बसबांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी सरनाईक म्हणाले की, नवीन लालपरीसह येणाऱ्या सर्व बसेसमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान एलईडी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ ॲॅनलाइज यंत्रणा, याबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञानवर आधारित, बस लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील.

तर स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार असून प्रवासात बसेस मध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासोबतच चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील या कॅमेराचा तिसरा डोळा लक्ष ठेवून असणार आहे. बसस्थानक व परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेस देखील पूर्णतः बंद राहतील, अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

महत्त्वाच्या माहितीसाठी एलईडी टीव्ही

नवीन बसेसमध्ये लावण्यात येणाऱ्या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून जाहिरातीबरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच तातडीचे संदेश प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासात देखील प्रवासी जगभरातील घडामोडींबाबत अपडेट राहतील. तसेच बसच्या बाहेरील बाजूस देखील जाहिरातींकरिता एलईडी पॅनल लावण्यात येणार आहेत. यातून महामंडळाचा जाहिरात महसूल वाढण्यास मदत होणार आहे.

फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा

सध्या तापमानवाढीमुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार आहे. बसमध्ये ज्या ठिकाणी आग प्रज्वलित होईल, त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी संबंधित फोम वापरून आग तत्काळ विझविण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in