मुख्यमंत्री परदेशातून परतल्यानंतर पालकमंत्रिपदाचा प्रश्न सोडवू - एकनाथ शिंदे

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री परदेशातून परतल्यानंतर पालकमंत्रिपदाचा प्रश्न सोडवू - एकनाथ शिंदे
Published on

मुंबई : राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून परतल्यानंतर आम्ही हा प्रश्न सोडविणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

पालकमंत्रिपदाच्या यादीतून काही मंत्र्यांना डावलण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा समावेश आहे. भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले होते. त्यानंतर भरत गोगावले यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.

पालकमंत्रिपदाच्या या घडामोडींवरून महायुतीत धूसफूस सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या असताना आता या चर्चांवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर आम्ही हा प्रश्नही सोडवणार आहोत, असे शिंदेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

राजकीय ऑपरेशन

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे काही आमदार फुटणार आहेत. अनेकजण तुम्हाला भेटून गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही राजकीय ऑपरेशन होणार आहे का, असा प्रश्न शिंदे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर शिंदे म्हणाले, तुम्ही त्याचा अर्थ राजकीय का काढता, जेव्हा आम्हाला असा रुग्ण मिळेल तेव्हा राजकीय ऑपरेशन करू, असे मिश्किल उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in