रिक्त पदांमुळे आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

या केंद्रांतर्गत येणाऱ्या आजूबाजूच्या गावातील शेकडो नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे केंद्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अडचणीत सापडले आहे.
रिक्त पदांमुळे आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर
Published on

मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे हे आरोग्य केंद्र सलाईनवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

या केंद्रांतर्गत येणाऱ्या आजूबाजूच्या गावातील शेकडो नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे केंद्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अडचणीत सापडले आहे. कर्मचारी नसल्यामुळे सर्व केद्रांचा भार उपस्थित कर्मचाऱ्यांवर पडला आहे. त्याचबरोबर नागरिकांना आरोग्य सेवा देण्यास देखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या आरोग्य केंद्राबाबत प्रतिशासन गंभीर असले तरी प्रशासन मात्र उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिकांना शासकीय आरोग्य केंद्राऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासकीय आरोग्य केंद्र असूनही खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुक्यातील एकमेव असलेल्या या आरोग्य केंद्राकडे लक्ष देऊन आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सध्या या रुग्णालयात आरोग्य कर्मचारी ४, आरोग्य सेविका ५, कंपाऊंडर १, शिपाई २, क्लार्क १, १ आरोग्य साहिका (एल.एच.व्ही), आरोग्य सहाय्यक१, वॉचमन ३ ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तात्काळ भरण्याची मागणी केली जात आहे.

सध्या आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नेमणूक असली तरी या ठिकाणी एकच डॉक्टर काम पाहत आहेत. तर दुसरे डॉक्टर डेप्युटेशनवर प्राथमिक आरोग्य केंद्र पेडांबे अलिबाग या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टरांची देखील कमतरता भासत असल्याची ओरड स्थानिकांनी केली आहे.

कर्मचारी नसल्याने आमच्यावर ताण पडत असला तरी आम्ही रुग्णांना चांगली सेवा देत आहोत. रिक्त पदासंदर्भात आम्ही जिल्हा आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.

- डॉ. उज्ज्वलदिप बाबुरडे, प्राथमिक आरोग्य केंद्र पेडाबे अलिबाग

logo
marathi.freepressjournal.in