जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून ओबीसी समाजाच्या मागणीचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा, यासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.
जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

जालना: 'ओबीसी आरक्षण बचाव'साठी लक्ष्मण हाके यांचं वडीगोद्री येथे उपोषण सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस असून सरकारकडून अपेक्षित दखल न घेतल्यामुळं ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आंदोलकांनी वडीगोद्रीत धुळे-सोलापूर महामार्ग आडवला आहे. पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र, आंदोलकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.

धुळे-सोलापूर महामार्ग रोखला-

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. ओबीसी समाजाच्या आणि संघटनांच्या मागणीचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा, यासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर मोठ्या संख्येनं येऊन रास्ता रोको केलं आहे. पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली, मात्र आंदोलकांनी आंदोलनावर ठाम आहेत.

शिष्टमंडळ भेटलं, पण तोडगा नाही...

सरकारचं एक शिष्टमंडळ काल लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आलं होतं. पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळं लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरुच ठेवलं आहे. त्यांची तब्येत खालावू लागली आहे. त्यांनी आज पाणी प्राशन केलं असलं तरी उपोषण सोडलं नाही. त्यामुळं ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहेत. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान रास्ता रोकोमुळं महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

जरांगेंच्या आंदोलनाला प्रतिसाद, मग हाकेंच्या का नाही-

सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करतंय, अशी आंदोलकांची भावना आहे. यापूर्वी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सरकारनं प्रतिसाद दिला, सरकारचे अनेक मंत्री आंदोलनस्थळी येऊन गेले होते. मात्र तसा प्रतिसाद लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला दिला नाही. हाकेंची तब्येत ढासळत असताना सरकार गप्प का, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. दरम्यान आज वडीगोद्री येथील आंदोलक आणि ग्रामस्थांच्या विनंतीवरून लक्ष्मण हाके यांनी पाणी घेतलं असलं तरी त्यांच्या तब्येत सातत्यानं खालावत आहे.

logo
marathi.freepressjournal.in