काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक, बाळासाहेब भवनाबाहेर जोडे मारो आंदोलन 

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येताच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ बंद करणार, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी केले होते. केदार यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनासमोर सुनील केदार यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले.
काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक, बाळासाहेब भवनाबाहेर जोडे मारो आंदोलन 
Published on

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येताच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ बंद करणार, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी केले होते. केदार यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनासमोर सुनील केदार यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन थोड्या वेळाने त्यांची सुटका केली.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेची राज्यभरात सर्वत्र चर्चा सुरू असून, तिला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. परंतु केवळ मतांसाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली आहे. मात्र, आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास ही योजना बंद करू, असे विधान माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी केले होते. सुनील केदार यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. महायुतीतील तिन्ही पक्षाकडून काँग्रेस आणि सुनील केदार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली.  शिवसेनेच्या महिला आघाडीने जोडे मारो आंदोलन केले. दरम्यान, बाळासाहेब भवन ते काँग्रेस कार्यालयापर्यंत आंदोलनकर्ते जात असताना, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. माजी आमदार मनीषा कायंदे, आमदार यामिनी जाधव, प्रवक्त्या शितल म्हात्रे आदी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

घोषणाबाजीने परिसर दणाणला

आंदोलनकर्त्यांनी केदार यांचे मोठे पोस्टर हाती घेत ‘जोडे मारो’ आंदोलन केले. मिळून साऱ्या बहिणी... काँग्रेसला पाजू पाणी, लाडक्या बहिणींची केदारला पोटदुखी, बँक घोटाळ्याचा आरोपी सुनील केदार मुर्दाबाद... केदारचे करायचे काय खाली डोक वर पाय... अशा घोषणाबाजी देत, आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात होता.

logo
marathi.freepressjournal.in