भाजप, काँग्रेसमध्ये आंदोलन ‘वॉर’; राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात आणि समर्थनार्थ दोन्ही पक्ष मैदानात

देशातील आरक्षण संपवण्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली असून शुक्रवारी मुंबईसह राज्यभरात आंदोलन केले.
भाजप, काँग्रेसमध्ये आंदोलन ‘वॉर’; राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात आणि समर्थनार्थ दोन्ही पक्ष मैदानात
Published on

मुंबई : देशातील आरक्षण संपवण्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली असून शुक्रवारी मुंबईसह राज्यभरात आंदोलन केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आशीष शेलार यांनी घाटकोपर येथे आंदोलन करत राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन नाक घासून माफी मागावी, अन्यथा आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. तर राहुल गांधी आरक्षणाविरोधात हा भाजपचा अपप्रचार असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर शुक्रवारी राज्यभर भाजपकडून आंदोलन करण्यात आले. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर यासह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात ठिकठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईत घाटकोपर परिसरात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर येथे पंकजा मुंडे आणि आशीष शेलार आंदोलनात सहभागी झाले होते. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला. राहुल गांधींचा धिक्कार आणि निषेध करतो. राहुल गांधी हे जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोवर आमचे आंदोलन सुरू राहील. त्यांनी आपल्या संविधनाचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला, तेव्हा मोदींनी माफी मागितली. यावर मनोज जरांगे काय बोलतात, त्यासाठी मी उत्सुक आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

धुळ्यात राहुल गांधींच्या प्रतिमेला चप्पल मारो !

धुळ्यातही राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करण्यात आले. तर सोलापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भाजप पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करत राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्यात आला.

राहुल गांधींच्या वक्तव्याचा रिपाइंकडून निषेध

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत आझाद मैदान येथे निषेध करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाने मुंबईत आझाद मैदान आणि राज्यभर अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारून तीव्र निषेध आंदोलन केले.

भाजपकडून खोटा प्रचार

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून सर्व समाज घटकाला आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी भूमिका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतलेली आहे. भाजप सरकारने सरकारी संस्था विकून नोकऱ्या संपवल्या. संवैधानिक संस्था संपवण्याचे काम केल्याचा भाजपाचा भांडाफोड केला आहे, म्हणून राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप खोटा प्रचार करत आहे, असे पटोले म्हणाले.

तरविंदरसिंह व भाजपविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

मुंबई : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे दिल्लीतील भाजपचे माजी आमदार तरविंदरसिंह मारवा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून भाजपचा निषेध केला. तसेच तरविंदरसिंह मारवा यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करून भाजपविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी वर्षा गायकवाड यांनी भाजपवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी तरविंदरसिंह मारवा यांच्या विधानावर भूमिका जाहीर करण्याची मागणी केली.

नागपूरमध्ये व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्यासह शेकडो महिलांनी नारेबाजी करून रस्ता रोको केला. पोलिसांनी यावेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना अटक केली. नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने भाजपचा जाहीर निषेध करण्यात आला. राज्यातील इतर भागातही काँग्रेसने आंदोलन करून भाजपचा धिक्कार केला. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात भाजपच्या आंदोलनावर ट्वीट करत म्हणाले की, “आरक्षण बंद करणार असे खासदार राहुल गांधी कधीही बोललेले नाहीत, त्यामुळे भाजपवाले नेमके कशासाठी आंदोलन करत आहेत? भाजप स्वत:च फेक न्यूज पसरवून आंदोलनाच्या नौटंक्या करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in