
मुंबई : कर्ज मिळाल्यानंतर लग्न, साखरपुडा करतात, असे वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना ४ एप्रिल रोजी केले होते. आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे बरळले. ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे वादग्रस्त विधान केले कोकाटे यांनी केले आणि नवीन वादाला तोंड फुटले आहे. मंत्री कोकाटे यांच्या विधानानंतर त्यांचे डोके ठिकाणावर आहे का, मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना समज द्यावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी पत्रकारांनी नुकसानीच्या संदर्भात विचारले असता नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली.
तर शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहेत, असे विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.