नाशिक : मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील न्यायालयाने गुरुवारी सुनावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून या निकालाने कृषिमंत्र्यांची आमदारकी व मंत्रिपदही धोक्यात आले आहे.
कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात ‘निर्माण व्ह्यू अपार्टमेंट’मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे, तर या इमारतीतील अन्य ज्या दोन सदनिका इतरांना मिळाल्या होत्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात पूर्ण झाली. गुरुवारी न्यायालयाने राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात आणखी दोन संशयित होते, मात्र त्यांची पुराव्याअभावी मुक्तता झाली. या दोघांच्या सदनिकांचा वापरही कोकाटे बंधूंकडून होत असल्याचे चौकशीत समोर आले होते.
जामीन मंजूर
न्यायालयाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अपिलात स्थगिती न मिळाल्यास त्यांची आमदारकी व पर्यायाने मंत्रिपदही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुनावणीच्या वेळी स्वतः कोकाटे न्यायालयात हजर होते. अपील दाखल करण्यासाठी त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली असून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हे प्रकरण ३० वर्षांपूर्वीचे आहे. तेव्हा मी नुकताच राजकारणात प्रवेश केला होता. मी आमदार होतो की नाही ते देखील मला माहिती नाही. तो काळ आणि आजच्या काळामध्ये फरक आहे, असे कोकाटे यांनी म्हटले आहे. याचबरोबर नंतरच्या काळात दिघोळे आणि माझे चांगले संबंध तयार झाले होते. सलोख्याचे संबंध होते, असे स्पष्ट करताना कोकाटे यांनी आपण रितसर जामीन घेतला असल्याचे स्पष्ट केले.
फसवणुकीचा गुन्हा
यासंदर्भात तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन (कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिक कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोकाटे उच्च न्यायालयात जाणार
हे राजकीय प्रकरण होते. तुकाराम दिघोळे हे त्यावेळेस राज्यमंत्री होते. त्यांचे आणि माझे वैर होते. त्यातूनच त्यांनी माझ्यावर केस केली होती. या केसचा निकाल आज ३० वर्षांनी लागला आहे. माझ्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते, यासंदर्भात मी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले. हे निकालपत्र मोठे आहे. मी अजून वाचले नाही. ते वाचून मी आपल्याला सर्व सांगेन. नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते केलेले आहे. राजीनाम्याची मागणी होऊ शकते. न्याय मागण्याचा अधिकार नागरिक म्हणून मला आहे.