
मुंबई : समृद्धी महामार्गाजवळ मॅग्नेट प्रकल्पांतर्गत ॲग्रो हब उभारा. ॲग्रो हबसाठी आराखडा तयार करा. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी पणन विभागाकडून १०० दिवसांत करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी घेतला.
सोयाबीन खरेदीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची सूचनाही फडणवीस यांनी केली आहे.
राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. राज्यातील चारही विभागात उभारण्यात येणाऱ्या ॲग्रो लाॅगिस्टीक हबचा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळकरिता अधिक मागणी आहे. त्यामुळे चाळींची संख्या वाढवावी, अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जाभूरगाव येथे ॲग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या ४५ दिवसांत त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी सांगितले.
परिपूर्ण समृद्धी महामार्ग फेब्रुवारीपर्यंत खुला होणार
शेतकऱ्यांच्या विरोधानंतर रद्द करण्यात आलेला शक्तिपीठ महामार्गबाबात पुन्हा एकदा हालचाल सुरू आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी ९३८५ हेक्टर जमीन संपादन करावी लागणार आहे. यात २६५ हेक्टर जमीन वनविभागाची आहे. समृद्धी महामार्ग फेब्रुवारीपर्यंत खुला करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रायल परिसरात सात मजली नवीन इमारत उभारण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृहात आगामी १०० दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित केले.