मुंबई : सध्या जे कोणी बोलतंय त्यांना बोलू द्या, या सगळ्यांचा समाचार दसरा मेळाव्याला घेणार आहे. ‘सौ सोनार की एक लोहार की’ या म्हणीनुसार विरोधकांचा फडशा पाडणार, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीला दिला आहे. न्यायालयात दाद मागितली तर मिळत नाही, म्हणून जनता दरबारी जात असून आई जगदंबेला साकडे घातले आहे, असेही ते म्हणाले. तोतयागिरीचा नायनाट करण्यासाठी ऑडियो गीत ‘मशाल हाती घे, सत्वर भूवरी ये’ या गाण्याचे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरूवारी अनावरण करण्यात आले.
दादर येथील शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, आमदार अनिल देसाई, गीतकार श्रीरंग गोडबोले आदी उपस्थित होते.
आजपासून नवरात्र सुरू झाला आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असुरांचा वध करून, जे असूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा हा दिवस आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आजची राजकीय पत्रकार परिषद नाही. राज्यात जे अराजक माजले आहे. त्यावर एक गाणे आहे. राज्यात सध्या तोतयेगिरी सुरू आहे. असेच अराजक शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर आले होते तेव्हा एकनाथांनी ‘बये दार उघड’ अशी आरोळी मारली होती. या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणे तयार केले आहे. देवी आणि जनतेच्या चरणी हे गाणे सादर करत आहोत. गाणे ऑडिओ आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
कोर्टात न्याय मिळत नसल्याची खंत
न्यायालयात लढूनही आम्हाला न्याय मिळत नाही. न्यायासाठी आम्ही जनतेच्या दरबारात जात आहोत, त्याआधी राज्यात अत्याचाररूपी दैत्याचा नायनाट करण्यासाठी आम्ही आई जगदंबेला साकडे घालणाऱ्या या गाण्याने साद घातली आहे. राज्यात जे अराजक माजलेले आहे, त्याचा नायनाट करण्यासाठी हे अराजकीय गाणे आहे, असे ते म्हणाले.