अपात्रतेच्या निकालापूर्वीच फडणवीसांचे भाकित; म्हणाले,"महायुती सरकार काल, आज अन् उद्याही स्थिर"

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अपात्रतेच्या निकालापूर्वीच फडणवीसांचे भाकित; म्हणाले,"महायुती सरकार काल, आज अन् उद्याही स्थिर"
Published on

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीनुसार उद्या (10 जानेवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निकाल दिला जाण्याची दाट शक्यता आहे. नार्वेकर काय निकाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थिर राहणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थिर असून सरकार कालही स्थिर होते आणि उद्याही ते स्थीर राहणार आहे, असा पूर्ण विश्वास मला असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होईल त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या सुनावणीचा निकाल येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी या भेटीवर आक्षेप घेतला. "विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेणे म्हणजे न्यायमूर्तींनी आरोपीची भेट घेण्यासारखे आहे”, अशा शब्दांत ठाकरे यांनी या भेटीवर टीका केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in