अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

अहिल्यानगरमध्ये दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी काढलेल्या फुलांच्या रांगोळीत धार्मिक शब्दांचा वापर झाल्याने बारातोटी कारंजा परिसरात तणाव निर्माण झाला. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून मुस्लिम समाजाने रास्ता रोको केला, तर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार
Published on

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीवरून तणाव उद्भवला. बारातोटी कारंजा परिसरात दुर्गा दौडच्या स्वागतासाठी फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीत धार्मिक शब्दांचा वापर करण्यात आल्याने तणाव वाढला. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत, मुस्लिम समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रानिमित्त शहरात दुर्गादौडचे आयोजन करण्यात आले होते. ही दौड शहराच्या मध्यवर्ती माळीवाडा भागातून जाणार होती. त्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती. ही रांगोळी आक्षेपार्ह असल्याची तक्रार करत माळीवाडा भागात जमाव जमला. या जमावाने आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान कोतवाली पोलिसांनी रांगोळी काढणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर जमाव वाढत गेल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. या निषेधार्थ मुस्लिम समाजाने महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलन बराच काळ चालल्याने दगडफेकीला सुरुवात झाली. त्यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पुन्हा लाठीमार केला. त्यानंतर पळापळ सुरू झाली. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली.

या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सध्या माझ्याकडे केवळ प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी यावर भाष्य करेन. पण अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक अशा घटना घडत आहेत का? याकडे लक्ष द्यावे लागेल. यामागे काही षडयंत्र आहे का? हे पाहावे लागेल. अशाप्रकारे लोकांमध्ये तणाव निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही. राज्यातील सामाजिक आरोग्य बिघडवण्यामागे नेमके कोण आहे? हे आपल्याला शोधावे लागेल. ते नक्की आम्ही शोधू व त्यावर कारवाईही करू.”

logo
marathi.freepressjournal.in