बदलापूर: अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या गुरुवारी दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेत सहवैमानिक बदलापुरातील दीपक पाठक यांचा मृत्यू झाला आहे. या विमान दुर्घटनेचे वृत्त कळताच दीपकच्या मित्रपरिवाराने त्याच्या निवासस्थानी धाव घेतली आहे.
अहमदाबाद-लंडनला अपघातातील सहवैमानिक दीपक पाठक हा बदलापुरात राहणारा होता. या विमान दुर्घटनेबाबत समजताच दीपकच्या बदलापुर पूर्वेकडील कात्रप परिसरातील रावल कॉम्प्लेक्स या निवासस्थानी त्याच्या मित्रांनी गर्दी केली आहे. त्यांना दुःख अनावर झाले आहे. या घटनेनंतर त्याच्या घरी मित्रपरिवाराची गर्दी झाली आहे.
विमान टेक ऑफ करण्यापूर्वी दुपारी दीपकचे त्याच्या आईशी फोनवरून बोलणे झाले होते. त्यानंतर कुटुंबातील कोणाचाही दीपकशी संवाद झालेला नाही. दीपक हा गेल्या ११ वर्षांपासून एअर इंडियात नोकरीला होता. त्याच्या कुटुंबात दोन विवाहित बहिणी, आई, वडील आणि तो असा त्यांचा परिवार आहे.
आम्हाला अद्यापही दीपकच्या बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही अजूनही त्याच्या बाबतीत आशावादी आहोत. - श्रुतिका शेजवळ, बहीण
अनेक वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. दीपक स्वभावाने खूप प्रेमळ आणि शांत होता. कामावरुन कधीही आला तरी एक दिवस तो मित्रपरिवारासाठी काढायचा. त्याच्या सगळ्या कामाविषयी तो आम्हाला सांगायचा. या घटनेतून तो सुखरूप घरी यावा, अशी आम्हाला आशा आहे. - आदित्य पाटील, दीपकचा मित्र