

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली आहे. मात्र, दुधातील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि आयआयटी, मुंबई यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा तयार करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष मीनेश शाह यांनी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन बोर्डाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी फडणवीस म्हणाले, राज्यात सध्या ४० टक्के दूध संघटित क्षेत्रातून प्रक्रिया केले जाते तर उर्वरित दूध असंघटित क्षेत्रातून येत असल्याने भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे अधिकाधिक उत्पादक आणि गावांना संघटित डेअरी व्यवस्थेत आणण्यावर सरकारचा भर आहे. देशभरात ७५ हजार नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळण्यासोबतच भेसळ रोखण्यास मदत होणार आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष टेस्ट स्ट्रिप विकसित करण्यात आली असून ही स्ट्रिप युरिया तसेच इतर भेसळ घटक ओळखण्यास सक्षम असून पुढील सहा महिन्यांत ती पूर्णपणे कार्यान्वित होईल.
अत्याधुनिक प्रयोगशाळा
नागपूरमधील बुटिबोरी येथे अत्याधुनिक डेअरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे तसेच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्यावतीने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यात दूध संकलन वाढवण्यात येत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या चाचणीसाठी केंद्राच्या एनपीडीडी योजनेंतंर्गत महानंदमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली असल्याची माहिती शाह यांनी यावेळी दिली.
महानंदच्या पुनरुज्जीवनाचे ७८ टक्के काम पूर्ण
राज्य सरकारने केलेल्या सहकार्यामुळे महानंदच्या पुनरुज्जीवनाला गती मिळाली असून सुमारे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. ३ लाख लिटर क्षमतेचा नवीन ग्रीनफिल्ड डेअरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महानंदा परिसरात सिग्नेचर पार्लर आणि अत्याधुनिक इमारत उभारण्यात आल्या आहेत. आरे आणि महानंदा यांच्या ब्रँडचे रिलाँचिंग लवकरच करण्यात येईल. मुंबईतील आरे कॉलनीमध्ये कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्प तसेच उदगीर येथे महानंदचे नवीन डेअरी प्लांट उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मीनेश शाह यांनी दिले.