
पुणे : भोपाळ येथील एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बीडमधील १८ वर्षीय विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्कर्ष महादेव हिंगणे असे या विद्यार्थ्यांचे नाव असून, त्याने बाथरूममध्ये स्वतःचा गळा चिरून जीवन संपवले. वानवडीतील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात (एएफएमसी) ही घटना घडली.
दरम्यान, उत्कर्षने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून, ती पुढील तपासासाठी पाठवण्यात आली आहे.
ताणतणाव, तसेच नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुणावर गेल्या वर्षभरापासून उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्या केलेला तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एम्स वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेसाठी तो ८ मे रोजी पुण्यात आला होता. वानवडीतील लष्कराच्या महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (१२ मे) पहाटे त्याने एएफएमसीच्या वसतिगृहातील प्रसाधनगृहात स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्या केली.