राज्यातील प्रत्येक जिल्हा एक्स्प्रेस-वेने जोडण्याचे लक्ष्य -राधेश्याम मोपलवार

राज्यात सुरू असणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या योजनाबद्ध आणि वेगवान अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात वॉररूमचे पुनरुज्जीवन करण्यात आले
राज्यातील प्रत्येक जिल्हा एक्स्प्रेस-वेने जोडण्याचे लक्ष्य -राधेश्याम मोपलवार
VGP

राज्यातील प्रत्येक जिल्हा एक्स्प्रेस-वेने जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुढच्या साधारण दहा वर्षांच्या कालावधीत राज्यातील एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवासासाठी जास्तीत जास्त आठ ते दहा तासांचा कालावधी लागेल. इतक्या कमी वेळात प्रवास शक्य होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयातील पायाभूत सुविधा वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. दैनिक 'नवशक्ती' आणि 'फ्री प्रेस जर्नल'सोबत अनौपचारिक गप्पांमध्ये ते बोलत होते.

राज्यात सुरू असणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या योजनाबद्ध आणि वेगवान अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात वॉररूमचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. राधेश्याम मोपलवार यांच्यावर या वॉररूमच्या महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग असेल वा इतर पायाभूत सुविधा प्रकल्प असतील, राधेश्याम मोपलवार यांनी गेल्या काही वर्षांत अतिशय वेगाने हे प्रकल्प पूर्ण केले आहेत. समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट. राधेश्याम मोपलवर यांनी या प्रकल्पाला मूर्त रूप दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्याकडे एमएसआरडीसी हे खाते होते. मोपलवार यांचे हेच काम पाहून राज्यातील विविध एक्स्प्रेस-वे, मेट्रो प्रकल्प, बुलेट ट्रेन आदी विकास प्रकल्प वेगाने मार्गी लागावेत यासाठी मोपलवारांकडे वॉररूमचे महासंचालक ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा हा एक्स्प्रेस-वेने जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे सांगून राधेश्याम मोपलवार म्हणाले, राज्यातील सर्व एक्स्प्रेस-वे हे ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस­-वे असणार आहेत. राज्यातील कुठल्याही टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी सात ते आठ तासांचाच कालावधी लागेल. पुढच्या सुमारे दहा वर्षांत हे शक्य होणार आहे. सध्या विरार-अलिबाग, पुणे रिंगरोड, जालना नांदेड ही कामे सुरू आहेत. येत्या काही काळात कोकण एक्स्प्रेस-वेचे काम देखील सुरू करण्यात येणार आहे. पात्रादेवीपर्यंत हा रस्ता जाईल. गोव्यातील मोपा विमानतळापर्यंत हा रस्ता नेण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.

राज्य आणि केंद्र सरकारच्या दरम्यान अतिशय चांगले सहकार्य आहे. दोन्ही सरकारांच्या पायाभूत सुविधा विकास खात्यांमध्ये चांगला समन्वय आहे. केंद्र आणि राज्य मिळून अनेक प्रकल्प राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याच्या विकासात पायाभूत सुविधांचा अतिशय मोलाचा वाटा असतो. येत्या काळात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा विकास झाल्याचे दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पायाभूत प्रकल्पांच्या निर्मितीवेळी कामगारांच्या सुरक्षेची देखील काळजी घेण्यात येते. निर्माणाधीन प्रकल्पाच्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात येते. प्रकल्पाच्या ठिकाणी दररोज सकाळी सुरक्षा विषयक ड्रील घेण्यात येते असेही राधेश्याम मोपलवार म्हणाले.

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाके नोव्हेंबर २०२६ नंतर बंद

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाके २०२६ नंतर बंद करण्यात येणार आहेत, अशी घोषणा राधेश्याम मोपलवार यांनी केली. प्रत्येक टोल समाप्तीची वेळ येत असते. उदा. भिवंडी बायपास रस्त्यावरील टोल १९९२ मध्ये सुरू झाला. तो १३ मार्च २०१७ रोजी संपला. १० नोव्हेंबर २०१० पासून, एमएसआरडीसीने सायन-पनवेल महामार्ग, पश्चिम द्रूतगती महामार्ग, पूर्वद्रूतगती महामार्ग आणि यावरील २७ उड्डाणपूल आदींसाठी खर्च केला. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकांना जास्त टोलचा सामना करावा लागला आहे. राज्य मोटार वाहन कायद्याच्या कलम २० नुसार, भांडवली खर्च वसूल झाल्यानंतर टोल रद्द करायचा आहे.

वाशी टोलनाक्यावरील आकारणी २०३६ पर्यंत

नवी मुंबई आणि त्यापुढील प्रवास करणाऱ्यांसाठी, ठाणे खाडीपुलाच्या खर्चाच्या वसुलीसाठी त्यांना १९ नोव्हेंबर २०२६ नंतरही टोल आकारला जाईल. वाशी येथील टोल आकारणी २०३६ पर्यंत सुरू राहणार आहे. दहिसर, एलबीएस रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस-वे हायवे आणि ऐरोली खाडी ब्रिज येथील टोलनाके बंद होतील. तसेच, शिवडी-चिर्ले मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास केल्यास टोल भरावा लागेल, जो यंदाच्या नोव्हेंबरपर्यंत तयार होणार आहे.

मुंबई-पुणे अंतर २५ मिनिटांनी कमी होणार

मुंबई-पुणे मिसिंग लिंक या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावर पूल व बोगदे आहेत. यामुळे मुंबई-पुणे प्रवास २५ मिनिटांनी कमी होणार आहे. खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यान १९ किमीचा हा मार्ग आहे. या मार्गाने वाहतुकीचे विलगीकरण होणार आहे. हा मार्ग मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

नागपूर-गोवा महामार्गाची उभारणी

विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडर (९६.४१ किमी), पुणे रिंग रस्ता (१३६.८० किमी) व जालना-नांदेड एक्स्प्रेस-वे (२०० किमी) उभारण्यात येणार आहे.

तसेच कोकण एक्स्प्रेस-वे (४५० किमी) उभारला जाणार आहे. त्याचबरोबर नागपूर-गोवा (७६० किमी) व नाशिक-पुणे (१८० किमी) एक्स्प्रेस-वे उभारण्यात येईल. विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडारच्या बाजूला मेट्रोची मार्गिका तयार केली जाईल. हा सर्व मार्ग उन्नत असेल. ५०० ते हजार मीटर अंतरावर मेट्रो स्टेशन असेल, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in