
पुणे : अहमदाबाद दुर्घटनेतील एअर इंडियाच्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' तपासणीसाठी भारताबाहेर पाठवलेला नाही. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो यांच्याकडून 'ब्लॅक बॉक्स'ची तपासणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी मंगळवारी दिली.
केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी पुण्यात आयोजित केलेल्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट समिट या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळसुद्धा उपस्थित होते. नायडू म्हणाले, की 'ब्लॅक बॉक्स' भारतातच असून एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो यांच्याकडून ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे आणि आम्ही तो बाहेर पाठवणार नाही. फक्त माध्यमात याची चर्चा आहे. पण, वस्तुस्थिती तशी नाही. 'ब्लॅक बॉक्स' डीकोड केल्याने अपघातापूर्वी काय घडले, याची सखोल माहिती मिळेल, असे सरकारने अपघातानंतर स्पष्ट केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.