अजितदादांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी - जितेंद्र आव्हाड

हिमंत असेल, तर स्वत:चा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढून दाखवा- आमदार जितेंद्र आव्हाड
अजितदादांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी - जितेंद्र आव्हाड

प्रतिनिधी/ठाणे

“जर, पवारसाहेब हे हुकूमशहा आहेत, तर त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी देशभर पोहोचविलेले निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढविण्याची भाषा का करता? हिमंत असेल, तर स्वत:चा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढून दाखवा. मग, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवेल,” असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिले.

अजित पवार यांनी बारामती येथे केलेल्या भाषणाचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. आव्हाड म्हणाले की, “निवडणूक आयोगात पात्र- अपात्रतेसंदर्भात लढाई सुरू आहे. त्या अनुषंगानेच अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, शरद पवार यांच्यावर हुकूमशहाचे आरोप केले. शरद पवार हे कुणाचे ऐकत नाहीत. ते सर्व निर्णय एकट्यानेच घेतात, असे आरोप करण्यात आले आहेत. या प्रतिज्ञापत्रावर पहिली सही सुनील तटकरे यांनी केली आहे. ज्या तटकरेंनी पहिली सही केली आहे, त्यांनाच शरद पवार यांनी दोन वेळा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले होते. मंत्रिपदही दिले होते. त्यांच्या मुलीला आमदारकी आणि मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले होते. एवढे सगळे घेऊनही सुनील तटकरे हे शरद पवार यांना हुकूमशहा कसे काय म्हणू शकतात?”

“राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे जन्मदाते शरद पवार हेच आहेत. त्यांनीच पक्षाला निवडणूक चिन्ह मिळवून दिले आहे. आता हाच पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेण्याचा प्रयत्न अजित पवार हे करत आहेत. अजित पवार नेहमीच म्हणत असतात की ते खोटे बोलत नाहीत. मग, त्यांनी खरे सांगावे की त्यांना कोणी घडविले. त्यांचे स्वत:चे योगदान काय आहे? या देशात केवळ दोन-तीनच नेते असे आहेत की त्यांनी बंड करून आपले अस्तित्व टिकवले आहे. त्यामध्ये शरद पवार अग्रस्थानी आहेत. काँग्रेसशी फारकत घेऊन नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांनी पक्षाला सत्तास्थानी बसवून अजित पवार यांना मानाचे स्थान दिले होते. शरद पवार यांचे निर्णय लोकाभिमुख होते. पण, अजित पवार यांनी ‘सुप्रमा’ अर्थात सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावाने गोंधळ घातला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनीच केले आहे,” असा आरोपही आव्हाड यांनी केला.

आव्हाड पुढे म्हणाले की, “शरद पवारांवर खोटे आरोप करणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावे की, “पवारांच्या घरी सकाळपासूनच जाणारे ते आठजण कोण होते? जेवढी मोकळीक पवारसाहेब यांनी दिली होती; तेवढी कोणत्याच पक्षात नाही. हीच मोठी चूक झाली. सर्वांना विश्वासात घेणाऱ्या शरद पवार यांचाच विश्वासघात करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आताच नवीन पक्ष नोंदणीसाठी अर्ज करून स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी. तेव्हा निर्णय महाराष्ट्रातील जनताच घेईल.”

अपात्रतेच्या निर्णयाची भीती नाही

अपात्रतेबाबत पत्रकारांनी विचारले असता आव्हाड म्हणाले की, “निर्णय काय येणार आहे, हे आम्हास माहित आहे. पण, आम्हाला त्याची भीती नाही. ज्या बापाने आम्हाला घडविले. त्या बापापुढे आमदारकी काय महत्त्वाची? ज्या बापाने आम्हाला घडविले. त्या बापासाठी मरण आले तरी बेहत्तर,” असा निर्धारही आव्हाड यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in