

मुंबई: अजित पवारांसारख्याराज्यातील एका प्रमुख नेत्याच्या संशयास्पद अपघाती मृत्यूवर विधिमंडळात चर्चा करू दिली जात नाही. याचा अर्थ काय? यावरून या अपघातामागे एक मोठी शक्ती असल्याच्या आमच्या संशयाची एकप्रकारे पुष्टीच झाली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे या अपघातामागील 'ती मोठी शक्ती कोण?' असा प्रश्न विचारला जात आहे.
अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामती येथे एका विमान अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून हा अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः आमदार रोहित पवार व अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. रोहित पवार यांनी मंगळवारीच याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या मुद्यावर विधिमंडळाच्या पटलावर चर्चा करण्याची मागणी केली होती. पण राहुल नार्वेकर यांनी बुधवारी सभागृहात यासंबंधी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला.
पाठपुरावा करतच राहू!
या ज्वलंत विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला असता बोलूही दिले गेले नाही, याचा अर्थ काय? यावरुन या अपघातामागे नक्कीच कोणती तरी एखादी मोठी शक्ती असल्याचा आमचा संशय असून या निर्णयामुळे आमच्या संशयाला एकप्रकारे पुष्टीच मिळत आहे. सरकारने अजितदादांच्या अपघाताच्या विषयाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र हा विषय सोडणार नाही. अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करतच राहू, असे रोहित पवार यांनी एका 'पोस्ट 'द्वारे स्पष्ट केले.
आमचा आवाज दाबला जात आहे!
आमचा आवाज दाबला जात आहे. अजितदादांविषयी आम्ही जेव्हा केव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला बोलू दिले जात नाही. त्यावरून आपल्याला समजून घ्यावे लागेल की, सत्तेतल्या लोकांनाच यावर चर्चा करायची नाही. हा अपघात की घातपात? यावर चर्चा होऊ दिली जात नसेल तर सत्ताधाऱ्यांपैकीच कुणीतरी एक अशी व्यक्ती आहे जो दादांच्या अपघाताला जबाबदार असू शकतो, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
अध्यक्षांनी चर्चेचा स्थगन प्रस्ताव फेटाळला
अजितदादांसारख्या राज्यातील एका प्रमुख नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्यांच्या या अपघातावर विधिमंडळात चर्चाही करू दिली जात नाही. याप्रकरणी विस्तृत चर्चेची मागणी मंगळवारीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. त्यामुळे बुधवारी हा स्थगन प्रस्ताव स्वीकारून अजितदादांच्या अपघातावर विस्तृत चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव नाकारला आणि विधानसभेत इतर विषयांवर बोलण्याची अनुमती दिली, असे नमूद करीत रोहित पवार यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला.