
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवी दिल्ली येथील अमित शाह यांच्या निवासस्थानी मध्यरात्री एक वाजता ही भेट झाली. त्यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित होते. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर जागावाटप करण्याची विनंती अजित पवार यांनी अमित शाहांना केली. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात विलंब लावू नये तसेच लवकरात लवकर जागावाटपाला अंतिम रुप देण्यात यावं अशी विनंतीही त्यांनी शाहांकडे केल्याचं समजतंय. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणूकीत ८०-९० जागांची मागणी त्यांनी केली आहे.
विधानसभेसाठी अजितदादांची ८०-९० जागांची मागणी-
इंडिया टुडेच्या एका रिपोर्टमध्ये सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे की, २०१९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीनं ज्या ५४ जागांवर विजय मिळवला आहे, त्या जागांसाठी अजित पवार आग्रही आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील २० जागांवरही अजित पवारांनी दावा केला आहे. या २० जागांवर सध्या काँग्रेसचे आमदार आहेत.
महायुतीत जागावाटपाचं आव्हान-
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. यामध्ये भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे. अजित पवार यांनी अमित शहांना भेटून ८०-९० जागांची मागणी केली आहे. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटानंही १०० जागा मागितल्या आहेत. तिकडे भाजपही १६० ते १७० जागांवर आपले उमेदवार उभे करू इच्छिते. त्यामुळं २८८ जागांचं वाटप महायुती कसं करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.