अजित पवार व आपण कुटुंब म्हणून एकत्रच! शरद पवार यांच्या स्पष्टीकरणाने संभ्रम

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण कुटुंब म्हणून एकत्रच आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी सोमवारी सांगितले. मात्र अजित पवार हे वेगळ्या राजकीय पक्षाचे नेतृत्व करीत आहेत, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार
शरद पवार
Published on

मुंबई/रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण कुटुंब म्हणून एकत्रच आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी सोमवारी सांगितले. मात्र अजित पवार हे वेगळ्या राजकीय पक्षाचे नेतृत्व करीत आहेत, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आम्ही घरात तरी एकत्रच आहोत, असे शरद पवार यांनी सोमवारी चिपळूण येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले. काका-पुतण्याने पुन्हा एकत्र यावे, अशी भावना समाजाच्या विविध स्तरातून व्यक्त केली जात आहे, असे विचारले असता शरद पवार यांनी वरील बाब स्पष्ट केली.

पत्नी सुनेत्रा यांना राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध लोकसभेची उमेदवारी देऊन चूक केली असे अजित पवार म्हणाले होते, त्याबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले की, दुसऱ्या पक्षाने घेतलेल्या निर्णयावर आपण भाष्य का करावे?

महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित केला आहे का, असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, या क्षणाला हा इतका तातडीचा विषय आहे असे आपल्याला वाटत नाही. सपा आणि शेकापच्या सहकार्याने महाराष्ट्रात पुरोगामी पर्याय देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी देण्याबाबत मतदार अनुकूल आहेत, असे आमच्या निदर्शनास आले असल्याचेही ते म्हणाले.

आपल्या भाषणात कोकणातील रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग व कराड-पाटणमार्गे चिपळूण मार्गाविषयी शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. ‘माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य वारंवार करतो, त्याला रोखण्यापेक्षा त्याची पाठराखण करण्याची भूमिका घेतली जाते, याचाच अर्थ सत्तेची मस्ती तुमच्या डोक्यात गेली आहे. मात्र याद राखा, आगामी काळात जनता तुम्हाला तुमची योग्य ती जागा दाखवेल हेही लक्षात ठेवा, असे पवार यांनी नारायण राणेंचे नाव न घेता त्यांना सुनावले. उगाच कोणी माझ्या नादाला लागू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘८० वर्षांत आम्ही उभारलेले पुतळे आजही टिकून आहेत. मात्र आताच्या सरकारने उभारलेले पुतळे काही दिवसांत कोसळतात. सगळ्याच ठिकाणी भ्रष्टाचार फोफावलेला आहे’, अशी टीका पवार यांनी यावेळी केली.

शरद पवारांच्या कोकण दौऱ्याला जोरदार प्रतिसाद

कोकण दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी सोमवारी कोकणात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला. चिपळूणमध्ये बहादूर शेख नाका येथील नगरपरिषदेच्या सावरकर मैदानात त्यांची जाहीरसभा झाली. या सभेला चिपळूणसह संगमेश्वर, रत्नागिरी, गुहागर आदी तालुक्यांमधून प्रचंड संख्येने लोकांनी हजेरी लावली होती.

logo
marathi.freepressjournal.in