

पुणे : बारामतीत झालेल्या या विमान दुर्घटनेत केवळ अजित पवारांचाच नव्हे तर विमानाच्या पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला. या विमानातील क्रूमध्ये पायलट कॅप्टन सुमित कपूर, विमानाची सहपायलट कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवारांचे सहकारी पोलीस शिपाई विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्यावरही काळाने घाला घातला.
मूळचे साताऱ्याचे असलेले पोलीस शिपाई विदीप जाधव हे २००९ पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि एक मुलगा आणि एक लहान मुलगी असा त्यांचा परिवार आहे. ठाण्यातील विटावा परिसरामध्ये राहणारे विदीप हे गेले काही वर्षे अजित पवारांचे बॉडीगार्ड म्हणून सावलीसारखे त्यांच्यासोबत असायचे. एक शिस्तबद्ध आणि सतर्क अंगरक्षक म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती. अजित पवार यांचे दौरे असोत किंवा सार्वजनिक सभा, विदीप जाधव कायम त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चोख पार पाडत असत. जाधव यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबाचा कर्ता पुरुष हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.
विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर यांना जवळपास १६ हजार तास विमान चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव होता. सुमित कपूर हे अपघातग्रस्त विमानाचे पायलट इन कमांड म्हणून काम पाहत होते. फ्लाइट क्रूचे नेतृत्व तेच करत होते. टेक ऑफ आणि लँडिंगचे नेतृत्वही त्यांच्याकडे होते. सहारा, जेट एअरवेज यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेले कपूर हे या क्षेत्रातील दिग्गज मानले जात होते. त्यांचा मुलगाही याच कंपनीत वैमानिक आहे.
या विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या शांभवी पाठक या विमानाच्या सहपायलट होत्या. त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. ग्वाल्हेरमधील वायु सेना बालभारती स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून ‘एरोनॉटिक्स’ (वैमानिकी) या विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी न्यूझीलंडमधील एका प्रसिद्ध व्यावसायिक पायलट अकादमीत प्रशिक्षण घेतले. २०१९ पर्यंत त्यांनी भारत आणि न्यूझीलंडचे कमर्शियल पायलट म्हणून लायसन्स मिळवले होते. पायलट होण्याबरोबरच त्या इतर उमेदवार पायलट्सना प्रशिक्षण देण्याचे कामही मध्य प्रदेश फ्लाइंग क्लबमध्ये करत होत्या. २०२२ पासून व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फर्स्ट ऑफिसर पदावर कार्यरत होत्या. शांभवी यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून व्यावसायिक पायलट परवाना मिळाला होता. त्यांचे वडील सैन्यदलात अधिकारी पदावर कार्यरत होते. तसेच शांभवी पाठक यांना १५०० तास विमान उड्डणांचा अनुभव होता.
फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी (२९) गेल्या सहा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या व्हीएसआर कंपनीमध्ये कार्यरत होत्या. यापूर्वी त्यांनी सांताक्रूझ येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम केले आहे. त्या मूळच्या उत्तर प्रदेशमधील जौनपूरच्या होत्या. तीन पिढ्यांपासून माळी कुटुंबीय मुंबईतील वरळी सेंच्युरी मिल परिसरामध्ये वास्तव्याला होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. सध्या पतीसह त्या ठाण्यात राहत होत्या. त्यांच्या पश्चात पती, वडील शिवकुमार माळी, आई आणि एक लहान भाऊ आहे. त्यांचे पती एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.