

मुंबई/पुणे : पुणे महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यात युती न झाल्यामुळे सत्तेतील दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. त्यातच अजित पवारांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर आता भाजपकडून अजितदादांची कोंडी केली जात आहे.
‘माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे सर्वांना माहीत आहे. पण ज्यांनी माझ्यावर हे आरोप केले, त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे ना,’ असा युक्तिवाद अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ‘पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला. स्थानिक नेत्यांची राक्षसी भूक दिसून आली,’ अशी टीका अजितदादांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर भाजपने चौफेर हल्लाबोल केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मंत्री आशिष शेलार यांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.
आशिष शेलार यांचा अजित पवार यांना इशारा
‘अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरांच्या विचारांवर चालणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आमचे विचार असे आहेत की, तुम्ही याल तर आम्ही तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्याशिवाय आणि विरोधात गेलात तर तुमच्याविरोधात जाऊ. आम्ही आमचे काम करू,’ अशा शब्दांत आशिष शेलार यांनी अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे.
“वीर सावरकरांच्या विचारांना अजित पवारांनी विरोध करण्याचे कारण नाही आणि त्यांनी कधी सावरकरांच्या विचारांना विरोध केला नाही. आजपर्यंत तरी त्यांनी विरोध केल्याचे मी पाहिले नाही. मात्र, आमची भूमिका पक्की आहे की, वीर सावरकरांच्या विचारांना विरोध आम्हाला मान्य नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका...
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही अप्रत्यक्ष इशारा देत सांगितले की, ‘महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर अजिबात टीका करायची नाही. मात्र, टीका करायला सुरुवात झाली. ही टीका किती चालणार? कुठे थांबणार? याचा अंदाज घेऊ. मागच्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत टीका करणाऱ्यांनी म्हटलं होतं की तिजोरीची चावी आमच्याकडे आहे, त्यानंतर मी भोरमधील एका सभेत म्हटले होते की तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपण आमच्याकडेच आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका’.
महायुतीमध्ये मनभेद निर्माण करणे अयोग्य
७० हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, अशी आठवण करून देत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मंगळवारी थेट इशारा दिला. जर आम्ही मागची पाने पलटली किंवा ती चाळली, तर अजितदादांना काहीच बोलता येणार नाही. आमची इच्छा नाही की ती जुनी पाने उघडावीत, परंतु दादांनी समन्वय समितीमध्ये ठरल्याप्रमाणेच वागावे, अशी आमची अपेक्षा आहे. अजितदादा हे प्रगल्भ नेते आहेत, मात्र एका महानगरपालिकेच्या छोट्या निवडणुकीसाठी जुने मुद्दे उकरून काढणे आणि महायुतीमध्ये मनभेद किंवा मतभेद निर्माण करणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
अजित पवारांची सारवासारव
७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चर्चा होऊ लागल्यानंतर अजित पवार यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. माझे म्हणणे पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेत्यांविषयी होते, अशी सारवासारव त्यांनी केली. ‘मी स्थानिक नेत्यांवर आरोप केले आणि पुरावे दिले. मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप केले नाहीत किंवा टीकाही केली नाही. केंद्रात आणि राज्यात एनडीए सरकार अतिशय पद्धतशीरपणे काम करत आहे. माध्यमांनी माझ्या विधानांचा विपर्यास केला,’ असे सांगत अजित पवार यांनी वादापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.